ठाणे शहरामधील मानपाडा पोलीसांनी एका ३३ वर्षीय महिलेला चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या माहिलेने पोलीस हवलादाराच्या पत्नीला स्वत: पोलीस असल्याचे सांगून तिच्या घरात चोरी केली. ‘मुंबई मीरर’ने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने हवलदाराच्या पत्नीशी फेसबुकवर मैत्री करुन ओळख वाढवली आणि त्यानंतर तिच्या घरात चोरी केली.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव भक्ती शिंदे असे आहे. भक्तीने फेसबुकवरुन विदीशा वाघ यांच्याशी मैत्री केली. विदीशा यांचे पती राजवर्धन वाघ हे घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत. फेसबुकवरील गप्पांनंतर अनेकदा भक्ती विदीशाच्या घरी जात असे. याच भेटी दरम्यान भक्तीने विदीशा यांच्या घरातील मोबाइल आणि दागिने चोरल्याचे विदीशा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भक्तीला अटक केली असून तिची चौकशी केली जात आहे. दरम्यान विदीशा यांनी ‘मुंबई मीरर’ बोलताना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. ‘माझ्या अनेक बड्या लोकांशी ओळखी असल्याचे भक्तीने मला सांगितले. तिने मला त्यांच्याबरोबरचे फोटोही दाखवले. ती अनेकदा डोंबिवलीमधील राजकीय नेत्यांबद्दल बोलायची. त्यामुळे ती खरोखरच पोलीस असल्याचे मला वाटले. आपण थ्री स्टार ऑफिसर असल्याचे तिने मला सांगितले तसेच तिने मला पोलिसांचे ओळखपत्रही दाखवले होते,’ असं विदीशा सांगतात. पोलीस असल्याचे सांगून ओळख वाढवल्यानंतर भक्तीचे विदीशाच्या घरी येणे जाणे वाढले. ‘खाजगी कारणांमुळे मला पोलीस दलातून काढून टाकण्यात आल्याचे सांगत भक्तीच्या विदीशाच्या घरच्या फेऱ्या वाढल्या. अचानक नोकरी गेल्यामुळे विदीशा यांना भक्तीबद्दल सहानभूती वाटू लागली. याचाच फायदा घेत भक्तीने विदीशाच्या घरी चोरी केली,’ असं मानपाडा पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक नासीर कुलकर्णी यांनी सांगितले.

‘३ एप्रिल रोजीही भक्ती माझ्या घरी आली होती. त्यावेळी भक्तीला घरात थांबायला सांगून मी किराणामाल घेण्यासाठी जवळच्या दुकानामध्ये गेले. थोड्या वेळाने भक्तीने माझ्या मुलीला मला बोलवून आण असं सांगत दुकानात पाठवले. या वेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधून माझा मोबाइल आणि लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन माझ्या घरातून पळ काढला’, असं विदीशा यांनी सांगितले.

विदीशा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भक्तीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर भक्तीकडे पोलिसांचे खोटे ओळखपत्र सापडले. अशाप्रकारे भक्तीने याआधीही लोकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. भक्तीने पोलीस असल्याचे सांगून तिनदा लग्न केले आहे. तिच्या तिसऱ्या पतीने तिच्याविरोधात कोपरखैणे पोलीस स्थानकांमध्ये तक्रार नोंदवल्याची माहितीही समोर आली असल्याचे मानपाडा पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.