कल्याण- टिटवाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनी भंगार माफियांशी संगनमत करुन पोलीस ठाण्यात चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले भंगार विकले होते. या प्रकरणी चौकशी होऊन वरिष्ठांनी दोन पोलिसांनी निलंबित केले आहे. शरद आव्हाड, सोमनाथ भांगरे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. या चोरी प्रकरणात अटक होऊ नये म्हणून दोन्ही पोलिसांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील सारथी फायनान्स संस्थेच्या अधिकाऱ्याकडून ४० कर्जदारांची फसवणूक
टिटवाळा पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात चोरट्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून चोरीचे भंगार जप्त केले होते. हे भंगार कायदेशीर कारवाईचा भाग म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले होते. या भंगाराकडे कोणाचे लक्ष नाही असा विचार करुन टिटवाळा पोलीस ठाण्यात कार्यरत भांगरे, आव्हाड या दोन हवालदारांनी वरिष्ठांना अंधारात ठेऊन रात्रीच्या वेळेत गुपचूप आवारातील काही भंगार भंगार माफियांना विकले. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा विषय पोलीस ठाण्यातील वरिष्ठांच्या निदर्शनास आला. त्यांनी चौकशी सुरू केली. यावेळी आव्हाड, भांगरे यांनी हा गैरप्रकार केला आहे असे निदर्शनास आले. या दोघांची खातेअंतर्गत चौकशी करुन त्यांना वरिष्ठांनी निलंबित केले. या दोन्ही पोलिसांनी आपली अटक टाळण्यासाठी कल्याण न्यायालयात अर्ज केला आहे.