|| पूर्वा साडविलकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे, नाशिक, रत्नागिरीतून प्रेक्षकांचा सहभाग

ठाणे : करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी आणि टाळेबंदी शिथिलीकरणाच्या नियमांमुळे ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांतील सांस्कृतिक कट्टे आणि संस्था त्यांचे कार्यक्रम फेसबुक पेज, यू-ट्यूब वाहिनी, झूम आणि गूगलमीट अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवीत आहेत. त्यामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आता केवळ जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिले नसून मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी या जिल्ह््यांमध्येही पोहोचू लागल्याचे संस्था चालकांकडून सांगण्यात आले.

ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा हा करोनाकाळात ऑनलाइनद्वारे महिन्यातून एक दिवस व्हायचा. मात्र, या ऑनलाइन कट्ट्याला जिल्ह्याबाहेरील रसिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता पुन्हा हा कट्टा दर बुधवारी ऑनलाइनच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कट्ट्याच्या संस्थापिका संपदा वागळे यांनी दिली. यापूर्वी कट्ट्यावर किंवा संस्थांच्या होणाऱ्या कार्यक्रमात शहरातील १०० ते २०० रसिक सहभागी व्हायचे. पण आता ऑनलाइनद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांना विविध ठिकाणांहून दीड ते दोन हजार रसिक सहभागी होत आहेत. त्यामुळे करोनाकाळात कट्टे आणि संस्थांनी समाजमाध्यमांमार्फत रसिकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला जिल्ह्यातूनच नाही तर, जिल्ह्याबाहेरूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

करोनाकाळात रसिकांपर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न उभा राहिला होता. परंतु काही दिवसांनंतर ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. ऑनलाइन कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद पाहता महिन्यातून एक दिवस होणारा कार्यक्रम पुन्हा दर आठवड्यास आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.

– राजेश जाधव, संस्थापक, ब्रह्मांड कट्टा, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona infection facebook youtube zoom goggle meet cultural katte institution program akp