ठाण्यात ‘समाज रक्षक पोलीस मित्र’ या मोहिमेंतर्गत सेवा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : ठाणे शहरात करोनाच्या रुग्णांची झपाटय़ाने वाढ होत असल्याने प्रशासनातर्फे महापालिका परिवहन, खासगी बसेच आणि शाळांचा व्हॅनचे रुपांतर रुग्णावाहिकांमध्ये केले जात आहे. या उपाययोजनेनंतरही शहरात रुग्णवाहीका कमी पडू नये यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी करोना रुग्णांना रिक्षातून रुग्णालयात नेण्याची परवानगी दिली आहे.

शहरातील ‘समाज रक्षक पोलीस मित्र’ या मोहिमेंतर्गत रिक्षातून रुग्णाला रुग्णालयात नेण्यास मदत केली जात असून ना नफा ना तोटा या तत्वावर या रिक्षा रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर-सावरकरनगर ,वागळे आणि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात दिवसेगणिक करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ  लागली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत शहारात रुग्णवाहिकेचा तुटवडा भासू लागला आहे.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी २५ अबोली रिक्षा चालकांना रुग्णांची वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. त्यापैकी एका आबोली रिक्षा चालकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होते. दरम्यान ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी करोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडू नये, यासाठी शहरातील रिक्षा चालकांना करोना रुग्णांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील समाज रक्षक पोलीस मित्र पुढाकार घेऊन त्यांच्या प्रभागातील काही रिक्षा चालकांची मदत घेत रुग्णांसाठी रिक्षा उपलब्ध करुन देत आहेत. या रिक्षांची माहिती शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाज रक्षक पोलीस मित्रांनी त्यांच्या वैयक्तीक फेसबूक खात्यांवर या रिक्षा चालकांचे नाव आणि संपर्क क्रमांक पोस्ट केले असून रुग्णाला रुग्णालयात नेण्याची गरज असल्यास संपर्क करावा, असे आवाहनही केले  आहे. तसेच या रिक्षांच्या माध्यमातून करोना बाधित रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही रुग्णालय गाठण्यास वाहतूकीचे साधन उपलब्ध झाले आहे. सध्या शहारात अशा सहा रिक्षा कार्यरत असून या संख्येत लवकरच वाढ होईल, अशी माहिती समाज रक्षक पोलीस मित्रांकडून देण्यात आली आहे. हे सर्व रिक्षा चालक ना नफा ना तोटा या तत्वावर रिक्षा रुग्णांसाठी उपलब्ध करुन देत असून वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.बी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालिका प्रशासनाच्या पाठिंब्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

रिक्षा चालकांची सुरक्षा

करोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात नेताना प्रवासादरम्यान रिक्षा चालकास करोना विषाणूची लागण होऊ  नये म्हणून रिक्षा चालकाच्या सीटच्या मागे प्लास्टिकचे आवरण लावण्यात येते. त्याचबरोबर रुग्णाला रुग्णालयात सोडल्यानंतर चालकांकडून वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती या रिक्षा चालकांनी दिली. त्यासोबतच सुरक्षेसाठी चालक गाडी चालवताना ग्लोज वापरत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patients travel in rickshaws now zws