जिल्ह्यात थांबलेले लसीकरण पुन्हा सुरू; तरीही संथगतीच

ठाणे : कोव्हिशिल्ड लशीचा साठा संपल्यामुळे सोमवारी बंद ठेवण्यात आलेली जिल्ह्याातील लसीकरण केंद्रे मंगळवारी सुरू झाली. राज्य शासनाकडून सोमवारी रात्री ठाणे जिल्ह्यााला ६० हजार कोव्हिशिल्ड लशीचा पुरवठा करण्यात आल्यामुळे ठाणे आणि अंबरनाथ शहर वगळता जिल्ह्याातील अन्य भागांतील केंद्रांवर लस उपलब्ध झाली.

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला. मात्र, कोव्हिशिल्ड लशीच्या अपुऱ्या साठ्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. सुरुवातीच्या काळात कोव्हिशिल्ड लशीचा जास्त साठा असल्यामुळे अनेकांना ही लस देण्यात आली आहे. पहिली मात्रा घेतल्यानंतर ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन गेल्यावरही दुसरी मात्रा मिळत नसल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. जिल्ह्याला शुक्रवारी राज्य शासनाकडून ४२ हजार ६०० लशींचा साठा उपलब्ध झाला. त्यात २७ हजार ४०० कोव्हिशिल्ड तर १५ हजार २०० कोव्हॅक्सिन लशींचा समावेश होता. लशींचा साठा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात शनिवारी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र शनिवारीच हा साठा संपला. त्यानंतर नवा साठा न आल्याने ठाणे महापालिकेने सोमवारी आणि मंगळवारी लसीकरण केंद्रे पुन्हा बंद ठेवली. मंगळवारी केवळ परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी दोन केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

राज्य शासनाकडून सोमवारी रात्री ठाणे जिल्ह्याला ६० हजार कोव्हिशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे मंगळवारी भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात लसीकरण सुरू होते. कल्याण-डोंबिवलीत अपुऱ्या लससाठ्यामुळे पूर्ण क्षमतेने लसीकरण केंद्रे सुरू नाहीत. मंगळवारी केवळ आठ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. या केंद्रांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली. तसेच उल्हासनगर शहरात दोन केंद्रांवर तर, ठाणे ग्रामीणमध्ये १३ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. ठाणे जिल्हा रुग्णालयातही कोव्हॅक्सिन लशीची  मात्रा देण्यात येत होती. ठाणे शहरातील इतर केंद्रे बंद असल्यामुळे या जिल्हा रुग्णालयात नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी झाली होती.

Story img Loader