कल्याण : हॉलिक्रॉस रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर शनिवारी दोन तरुणींमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
कल्याण पश्चिमेतील हॉलिक्रॉस रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणासाठी दोन तरुणी रांगेत उभ्या होत्या. रांगेत उभे राहण्यावरून त्यांच्यात सुरुवातीला खटके उडाले. शाब्दिक चकमकीचे पर्यवसान पुढे हाणामारीत झाले. रांगेतील इतर नागरिक आणि केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या तरुणींमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हाणामारी सोडवण्यात त्यांना अपयश आले.
या प्रकाराची चित्रफीत दुपारनंतर समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या दोन्ही तरुणींची नावे कळू शकलेली नाहीत. शनिवारी सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.