भाजपची लस ७८०, तर शिवसेनेची लस ५०० रुपयांना

बदलापूर : शासकीय लसीकरण केंद्रांवर लसटंचाई असल्याने बदलापुरात भाजपच्या वतीने ७८० रुपयांत लसीकरण केले जात होते. भाजपच्या या लसीकरणावर टीका होत असतानाच बदलापूर शिवसेना शहर शाखेने किमतींवरून भाजपवर कुरघोडी करत ५०० रुपये दरात लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, ८ जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे. शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरणाबाबत निराशा पदरी पडणाऱ्या नागरिकांसाठी फायदा होत असला तरी शहरात लसीकरणावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालयातील कै. दुबे रुग्णालय, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण तीन ठिकाणी बदलापुरात लस उपलब्ध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ येते आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचा हिरमोड होतो आहे. करोना विषाणूच्या डेल्टा उत्परिवर्तीत प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र लशीच्या तुटवड्यामुळे अनेक दिवस वाट पाहावी लागते आहे. गेल्या आठवड्यात शहरात भाजपच्या वतीने खा. कपिल पाटील यांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी ७८० रुपये आकारले जात होते. बदलापूर पश्चिमेतील खासगी महाविद्यालयात हे लसीकरण पार पडले, तर सध्या पूर्वेतील काटदरे सभागृहात लसीकरण सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत लस घेण्यासाठी शहरातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. खासदारांनी सुरू केलेल्या या सशुल्क मोहिमेवर टीकाही केली गेली. असे असतानाच भाजपपाठोपाठ आता शिवसेनेनेही सशुल्क लसीकरण मोहिमेची घोषणा केली आहे. भाजपच्या वतीने जी लस ७८० रुपयांना दिली जात होती. ती लस शिवसेनेने ५०० रुपयांना उपलब्ध करून देत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ८ जुलै रोजी पश्चिमेतील पाटील मंगल कार्यालयात हे लसीकरण पार पडेल. त्यामुळे शहरात आता लसीकरणावरून चढाओढ पाहायला मिळते आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लसीकरण मोहिमा राबवल्या जात असल्याचे बोलले जाते. मात्र लशींच्या किमतींवरून शिवसेना-भाजपात चढाओढ असली तरी नागरिकांना मात्र वेळेत लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे.

शासकीय केंद्रांवर लशींचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयांच्या मदतीने नागरिकांना वेळेत लस उपलब्ध करून देण्यासाठी ८ जुलै रोजी पश्चिमेतील पाटील मंगल कार्यालयात लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. शासकीय किंमत नागरिकांना परवडणारी नसल्याने लशीच्या किमतीचा काही भार शिवसेना उचलणार आहे.

– श्रीधर पाटील, संवेग फाऊंडेशन.

 

लसीवरून घाणेरडे राजकारण सुरू आहे. लस द्यायचीच होती तर आधी द्यायची होती. आम्ही कंपनीच्या दरातच लस देतो आहोत. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. – संजय भोईर, शहराध्यक्ष, भाजप.

Story img Loader