केंद्रीय पथकाची ठाणे जिल्ह्यातील पालिकांना सूचना

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गाफील राहू नका. तिसरी लाट येणार असल्याचे गृहीत धरूनच आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा आणि निर्बंध आणखी शिथिल करू नका, अशा सूचना केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील महापालिकांना गुरुवारी दिल्या.

केंद्रीय पथकाने गुरुवारी ठाण्यात करोनास्थितीचा आढावा घेतला. ठाणे महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय पथकातील राज्याचे नोडल अधिकारी कुणाल कुमार आणि डॉ.अजित शेवाळे यांच्यासह जिल्ह्यातील महापालिकांचे आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर अनेक नागरिक करोना नियमांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. या प्रवृत्तीमुळे करोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, तसेच करोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांच्या संख्येत दीडपट वाढ करा, अशा सूचना पथकाने दिल्या.

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणेतील उणिवा समोर आल्या होत्या. संभाव्य तिसऱ्या लाटेआधी सर्व उणिवा दूर करण्यावर भर द्यावा. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी व तरुणांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद वाढवा, याद्वारे त्यांच्यामध्ये करोनाविषयक जनजागृती करा, केवळ तंत्रज्ञानावर भर देऊ नका तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करा, आरोग्य यंत्रणेत समन्वय ठेवा आणि मृत्युदर वाढणार नाही, याची काळजी घ्या, असेही पथकाने सांगितले.

दरम्यान, केंद्रीय पथकाने गुरुवारी कोल्हापूरलाही भेट दिली.

‘दुकाने ८ वाजपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्या’

शनिवार आणि रविवारसह इतर दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत व्यापारी दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास कायद्याचे उल्लंघन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, असे ‘नौपाडा व्यापारी संघटने’चे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले.

Story img Loader