लशींच्या कमतरतेमुळे नियोजन करताना प्रशासनाची भंबेरी; नागरिक, कर्मचाऱ्यांमध्ये खटके

ठाणे : जिल्ह्यात लशींच्या तुटवड्याअभावी गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेत सातत्याने खंड पडत आहे. सोमवारी तब्बल आठ दिवसांनंतर शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू झाले खरे, मात्र अनेक ठिकाणी नागरिकांची उडालेली झुंबड, लशींच्या कमतरतेमुळे नियोजन करताना प्रशासनाची उडालेली भंबेरी, नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जागोजागी उडालेले खटके यांमुळे गोंधळाची परिस्थिती कायम होती.

जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुरू होते. त्यामुळे नागरिकांनी पहाटेपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. ठाण्यातील घंटाळी परिसरातील महापालिकेच्या केंद्रावर ४५ वर्षांपुढील ३०० नागरिकांचे लसीकरण होणार होते. यासाठी नागरिक पहाटेपासून कूपन घेण्यासाठी आले होते. या ठिकाणी काही जणांनाच कूपन देण्यात आले आणि नंतर कूपन संपले, असे नागरिकांना सांगण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. असे चित्र जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर होते.

अंबरनाथ शहरातील लसीकरण केंद्रे सोमवारी बंद होती. एकीकडे शासकीय केंद्रांवर लशींचा ठणठणाट असताना खासगी केंद्रांवर लसीकरण मोहीम अगदी जोमाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात लशीच्या कमतरतेमुळे महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनावर आठवड्यातून एक किंवा दोन दिवस लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी लशींचा संपूर्ण साठा संपल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. राज्य शासनाकडून शनिवारी जिल्ह्याला केवळ ४७ हजार ३४० लशींचा साठा प्राप्त झाला. त्यामध्ये ४२ हजार कोव्हिशिल्ड तर ५ हजार ३४० कोव्हॅक्सिनचा समावेश होता. हा साठाही एक दिवस पुरेल इतकाच होता.

सोमवारी जिल्ह्यातील ठप्प झालेली लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली. लशींचा साठा कमी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुरू होते. बऱ्याच दिवसांनंतर लसीकरण सुरू झाल्यामुळे नागरिकांनी केंद्रांवर पहाटेपासून रांगा लावल्याचे दिसून आले. ठाणे शहरात सोमवारी ५४ लसीकरण केंद्रे सुरू होती. यापैकी एका केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने तर इतर केंद्रावर ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुरू होते. ‘वॉक इन’पद्धतीने लसीकरण असल्यामुळे नागरिकांनी सर्वच केंद्रांवर गर्दी केली. महापालिकेने ठरवून दिलेली कूपन संख्या केंद्रांवर उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

कल्याण- डोंबिवली शहरात २२ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यापैकी २० केंद्रांवर कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा देण्याचे पालिकेचे नियोजन होते. डोंबिवलीत सावित्रीबाई नाट्यमंदिर आणि कल्याणमध्ये अत्रे नाट्यमंदिर येथे कोव्हॅक्सिन लशीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात आली. अनेक केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे याठिकाणी गोंधळ उडाला होता. भिवंडी शहरात पाच, बदलापूर शहरात तीन, उल्हासनगरमधील नऊ पैकी सहा आणि ठाणे ग्रामीणमध्ये ५१ केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

खासगी केंद्रांवर लसीकरण जोमात

जिल्ह्यातील शासकीय लसीकरण केंद्रांवर लशीच्या तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत असताना, दुसरीकडे खासगी केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध खासगी लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ६ लाख ४६ हजार ६२० नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे. त्यामध्ये ५ लाख ६१ हजार १८७ नागरिकांची पहिली मात्रा, तर ८५ हजार ४३३ नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. तसेच ५८ हजार २७९ नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. त्यामध्ये ३७ हजार ८९४ नागरिकांची पहिली मात्रा, तर २० हजार ३८५ नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. लस तुटवड्यामुळे शासकीय केंद्रांवर नेहमीच गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते. अनेकदा केंद्रे बंदही ठेवावी लागतात. यामुळे अनेक नागरिक खासगी केंद्रांवर सशुल्क लसीकरण करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

आज लसीकरण बंद

राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला शनिवारी केवळ ४७ हजार ३४० लशींचा साठा प्राप्त झाला होता. हा साठा प्राप्त होताच जिल्ह्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी मोठ्यासंख्येने लसीकरण केंद्रे सुरू केली. प्रत्येक केंद्रांवर २०० ते ३०० नागरिकांना लस देण्यात आली. ठाणे महापालिकेला १० हजार ५०० लशीचा साठा देण्यात आला होता. कल्याण- डोंबिवली महापालिकेला ९ हजार १३० लशींचा साठा देण्यात आला होता. हा साठा एका दिवसातच संपला असून नवीन साठा अद्याप या पालिकांना उपलब्ध झालेला नाही. तसेच बदलापूरातही लशींचा साठा संपला आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण- डोंबिवली तसेच बदलापूर शहारतील लसीकरण मंगळवारी बंद राहणार आहे.

 

Story img Loader