पालिकेला आठवड्याभरात १० ते १२ हजार लस कुप्या
कल्याण : लसपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शहरांमधील लसीकरणात सातत्याने व्यत्यय येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहराच्या विविध भागांतील आठ केंद्रांवर लसीकरण सुरूझाल्याने तेथे लस घेण्यासाठी लाभार्थ्यांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. कल्याणमध्ये आचार्य अत्रे रंगमंदिरासमोरील रांगेत ५०० ते ६०० लाभार्थी होते. ही रांग शंकरराव चौक, पालिका मुख्यालय ते शिवाजी चौकापर्यंत पोहोचली होती.
शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस साठा उपलब्ध होत नसल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. खासगी केंद्रचालकांना रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने काही केंद्रचालक केंद्र बंद करण्याच्या विचारात आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पालिका हद्दीतील २५ केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. पालिकेला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा १० ते १२ हजार लस कुप्या उपलब्ध होतात. त्या २५ केंद्रांना पुरेशा नसल्याने ठरावीक केंद्रांना या कुप्या उपलब्ध करून दिल्या जातात. सर्व केंद्रे सुरळीत चालविण्यासाठी तसेच वेळेत लसीकरण पूर्ण होण्यासाठी पालिकेने शासनाकडे सहा लाख कुप्यांची मागणी केली आहे. २५ केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी दररोज २५ ते ३० हजार कुप्यांची पालिकेला गरज आहे, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. अनेक लाभार्थींना कोव्हिशील्ड लशीची दुसरी मात्रा घ्यायची आहे. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने ही मात्रा उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ, वृद्ध, तरुण संताप व्यक्त करीत आहेत. अनेक तरुणांना परदेशी शिक्षणासाठी जायचे आहे. ते कोव्हिशील्ड लशीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनाही लशीसाठी वणवण भटकंती करावी लागते.
डोंबिवलीत एम्स रुग्णालयाने कोव्हॅक्सिन लस सशुल्क दरात उपलब्ध करून दिली आहे. अनेक रहिवासी या ठिकाणी जाऊन लस मात्रा घेत आहेत. कोव्हिशील्ड लस साठा उपलब्ध झाल्यानंतर ही लस येथे देण्याचे नियोजन केले आहे, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी सांगितले. ममता रुग्णालयात लशीची सुविधा सशुल्क पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिका हद्दीत आठ केंद्रे मंगळवारी सुरू होती. या केंद्रांबाहेर रहिवाशांनी लशीसाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात गेल्या दोन महिन्यांपासून पाच हजारांहून अधिक लाभार्थींनी लस मात्रेचा लाभ घेतला. अत्रे रंगमंदिरातील केंद्राला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक रहिवासी कोविन अॅपवर नोंदणी करून तर काही थेट केंद्रांवर येऊन लस घेत आहेत.