धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
विरार : करोना उपचारानंतर तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या संदर्भात शासनाचे कडक निर्बंध असताना वसईतील एका रुग्णालयात रात्रीच्या वेळी वापरलेले पीपीई संच सर्रास जाळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
वसईतील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल डिकुन्हा यांना स्थानिक गावकऱ्यांनी माहिती दिली की, वसई येथील बाभोळा परिसरात असलेल्या जनसेवा या खासगी कोविड रुग्णालयात दिवसभर करोना रुग्णाच्या उपचारादरम्यान वापरले पीपीई संच रात्रीच्या वेळी रुग्णालयाच्या मागच्या मोकळ्या जागेत पेटवले जातात. त्याचा धूर सर्व परिसरात पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या माहितीच्या आधारे डिकुन्हा यांनी रविवारी रात्री या रुग्णालयाच्या मागच्या बाजूला जाऊन पाहणी केली असता त्यांना रुग्णालयातील कर्मचारी पीपीई संच आणि मुखपट्ट्या पेटवत असल्याचे आढळून आले. या वेळी डिकुन्हा यांनी विचारणा केली असता त्यांना कोणताही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत म्हणून त्यांनी वसई विरार महानगरपालिका प्रभाग ‘आय’चे आरोग्य अधिकारी यांना याची माहिती दिली.
डिकुन्हा यांनी सांगितले की, दररोज या रुग्णालयाच्या मागच्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडत आहे. पीपीई संच हा जैविक कचरा आहे. याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने काही नियम ठरवून दिले आहेत. असे असतानाही रुग्णालयाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. यामुळे रुग्णालयावर कडक कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी विकास पाटील यांनी माहिती दिली की, त्यांनी रुग्णालयाला याबाबत खुलासा देण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय विभागाकडून अहवाल आल्यास रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल.
दरम्यान, दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे पीपीई संच नसल्याचा दावा केला आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रसाद राऊत यांनी माहिती दिली की, कर्मचारी यांनी जळालेला कचरा हा पीपीई संच नव्हता ते इतर रुग्णालयातील बिनकामाची कागदपत्रे पेटवत होता. हे केवळ रुग्णालयाला बदमान करण्याचे काम आहे. पालिकेला याबाबत आम्ही रीतसर खुलासा देत आहोत.
पैसे वाचविण्यासाठी अशी विल्हेवाट
वसई विरार परिसरात ४३ कोविड रुग्णालये आहेत यात निघणारा जैविक कचरा उचलण्यासाठी पालिकेने शासकीय नियमावलीत ठेकेदाराची नेमणूक केली आहे. या ठेकेदाराकडून करोना महासाथीच्या उपचारादरम्यान निर्माण झालेला कचरा उचलून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यासाठी रुग्णालयाकडून प्रति किलो १०० रुपये दर आकाराला जातो. साधारणत: एका रुग्णालयातून ५ ते १० किलो कचरा निघत असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागकडून दिली. यामुळे केवळ ५०० ते १००० रुपये वाचविण्यासाठी रुग्णालये जैविक कचरा जाळला जात आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.