ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील लसीकरण केंद्रे लस तुटवड्यामुळे शनिवारी बंद राहणार आहेत. तर भिवंडीतील दोन केंद्रांवर आणि ठाणे ग्रामीणमधील १४ आणि उल्हासनगरमधील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.
जिल्ह्याला लशीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे अनेक केंद्रांवर आठवड्यातून दोन ते तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यात अनेकांची दुसऱ्या मात्रेची कालमर्यादाही संपली असून दुसरी मात्रा मिळत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.
भिवंडीत लसीकरणाची पाच केंद्रे असून त्यापैकी खुदाबक्श सभागृह आणि महापालिका शाळा क्रमांक ७५ हे दोन केंद्रे तर, ठाणे ग्रामीण भागांतील १४ आणि उल्हासनगरमधील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.
लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर
मुंबई : राज्यात करोना लसीकरण मोहिमेत शुक्रवारी रात्री आठपर्यंत सहा लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे राज्यात लसची पहिली मात्रा मिळालेल्यांची संख्या तीन कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.