विक्रीसाठी तात्पुरती सोय करण्याची वसईतील शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे मागणी

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : टाळेबंदीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याने वसई-विरार शहरातील भाजीपाला मंडया  आणि जीवनाश्यक वस्तूंची दुकाने चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याने वसई परिसरात  पिकविण्यात आलेला भाजीपाला सध्या बांधावरच  पडून आहे. टाळेबंदी काळातील नियम पाळले न गेल्याने तो बाजारात आणला जात नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला भाजीपाला विकण्यासाठी तात्पुरती सोय करून देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

सध्या दूधी, वांगी, फ्लॉवर, पालक,  मेथी, चवळी, भेंडी,  गवार,  लाल भाजीची लागवड करण्यात आली आहे.  या भाज्यांचे उत्पादन तयार आहे. मात्र, टाळेबंदीमुळे तयार भाज्या विक्रीसाठी बाजारात आलेल्या नाहीत. यातील काही भाजीपाल्याची वाहतूक मधल्या काही काळात सुरू होती. मात्र, त्यानंतर  भाज्यांची शेतातून उचल झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण शेतमाल शेतातच पडून आहे.

वसईतील कळंब, राजोडी, सत्पाळा, अर्नाळा आणि आजूबाजूच्या परिसरात फळभाज्यांचे उत्पन्न घेतले जाते. सध्या करोनामळे भाज्यांची वाहतूक बंद आहे.  तरीही काही शेतकऱ्यांनी ताजा भाजीपाला खराब होऊ नये, यासाठी तो सेवा भावी संस्था आणि आश्रमांसाठी मोफत दिला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

टाळेबंदीत भाजीपाला विक्री बंद आहे. त्यामुळे पिकविलेला भाजीपाला वाया गेला आहे.  टाळेबंदीत राज्य सरकारने जर एखादी बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर थोडय़ाफार प्रमाणात दिलासा मिळेल.

-किरण पाटील, अर्नाळा

Story img Loader