कॉर्पोरेट कीर्तन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत वाङ्मयातील विचारधन नव्या स्वरूपात सादर केले तर तरुण पिढीला भावते. त्यातील मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या उपयोगी पडते. कल्याणमधील तरुण अभियंता समीर लिमये सादर करत असलेल्या दासबोधावर आधारित कॉर्पोरेट कीर्तनाला मिळत असलेली लोकप्रियता त्याचेच द्योतक आहे. अक्षय्य तृतीयेला या कॉर्पोरेट कीर्तनाचा शंभरावा प्रयोग ठाण्यात सादर होतोय..

मनोरंजनातून लोकप्रबोधन करण्याची आपली जुनी परंपरा आहे. भारूड, फटका, गण, गवळण, कीर्तन यांमधून लोकांचे समाजभान जागृत ठेवण्याचे काम ही माध्यमे पूर्वीपासून करत आली आहेत. सध्याच्या काळात मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे आणि बदलल्यामुळे कीर्तन हा प्रकार तरुणांना तितकासा आकर्षक वाटत नाही. मग आपल्या संतांच्या काळातील विचार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचावेत? या विचाराने पछाडलेल्या कल्याणमधील तरुण यांत्रिक अभियंते समीर लिमये यातून मार्ग शोधत होते. स्वत: नाटय़क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यामुळे आणि आपल्या बीटआर्ट या निर्मिती संस्थेद्वारे अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी फिल्म्स बनवताना येणारे अनुभव, चर्चा यातून त्यांना एक वाट दिसली. दासबोधाचा अभ्यास आणि सज्जनगडावरच्या भेटी एकीकडे सुरू असताना त्यांच्या एक लक्षात आलं की कुठल्याही संघटनेची एक व्यवस्था, शिस्त असते. नियोजन असते. त्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन कार्यकर्ते, कर्मचारी करीत असतात. त्यांची तत्त्वे, नियमावली आणि त्याचे शिस्तबद्ध पालन यातून ती संस्था यशस्वी होते. सज्जनगडावरच्या ३५० वर्षे जुन्या समर्थ रामदासांनी घालून दिलेल्या तत्त्वप्रणालीवर आजही शिस्तबद्धपणे काम सुरू असते. मग या दोन्हीची सांगड घालता येईल का? कशी? विचार वेग धरू लागले. त्यांनी दिलेल्या दाखल्यातून आजच्या तरुणांना, कॉर्पोरेट जगात वावरतानाही विवेक, संयम यांची शिकवण किती लाभदायी आहे हे सांगता येईल असे त्यांना वाटले. त्यासाठी कीर्तन हा प्रकार लोकांना कळेल, खूप आवडेल असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून  मूळ कीर्तन तत्त्वाला धक्का न लावता सादर झाले ते कॉर्पोरेट कीर्तन.

समीरची लिमये यांच्या व्यवसायातील भागीदार धनश्री नानिवडेकर यांनी या कॉर्पोरेट कीर्तनाची निर्मिती केली आहे. त्या इंग्रजी वाङ्मयाच्या पदवीधर आहेत. मानसी सबनीस सहगायिका आहेत. त्यांनी स्वत: समर्थाच्या  काही रचनांना सुरेख चाली लावल्या आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात ‘मन, मेंदू आणि मनगट’ यांचे सुयोग्य संतुलन म्हणजे शिक्षण. पण सध्याच्या शाळा, कॉलेज आणि पदव्युत्तर शिक्षणात फक्त मेंदूच केंद्रस्थानी दिसतो. त्यामुळेच आताच्या काळात दासबोध पथदर्शक आहे.

कॉर्पोरेट कीर्तनाच्या सुमारे अडीच तासांच्या प्रयोगात दासबोध आणि मॅनेजमेंट, दासबोध आणि व्यवसाय, दासबोध आणि समर्थकालीन सुपरवुमन तसेच दासबोध सर्वासाठी असे चार भाग तयार करण्यात आले आहेत.  श्रोत्यांचा वयोगट आणि आयोजकांचा हेतू लक्षात घेऊन त्यातील एक भाग सादर केला जातो. त्यात कुठेही प्रासादिक, पारंपरिक भाषेचा अट्टहास न धरता प्रचलित भाषेत अतिशय रंजक आणि रसाळ पद्धतीने समीर लिमये सादरीकरण करतात. आतापर्यंत कल्याण, ठाणे, दादर, पार्ले, भाईंदर इत्यादी ठिकाणी तर पुण्यात ५ वेळा डोंबिवलीत १९ वेळा तसेच दुबई, सिंगापूर येथेही कॉर्पोरेट कीर्तनचे प्रयोग सादर झाले आहेत. राजकारण, समाजकारण, संगीत, स्वगुण परीक्षा, देवत्म निरूपण, सर्वदयासंगे, बुद्धिवाद अशा जीवनाच्या प्रत्येक अंगावर भाष्य करीत, अनेक वृत्त छंद याचा वापर करीत समर्थ रामदासांनी दासबोध सिद्ध केला आहे. शाळेत मराठी व्याकरण शिकवताना वृत्त छंद शिकवले जातात. त्याचाच सुंदर वापर आपल्या पारंपरिक अभंग ओव्यांमध्ये आहे. गरज आहे ती नवीन पिढीला त्यातले सौंदर्य रसपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवण्याची.

कॉर्पोरेट कीर्तनाचा पहिला प्रयोग २०१४ मध्ये समीर लिमये यांनी अभिनेते शरद पोंक्षे आणि समर्थभक्त सुनील दादा चिंचोळकर यांच्या सोबत सादर केला. समर्थाच्या आशीर्वादानेच ही समर्थ चळवळ पुढे जात आहे. लोकांनी हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे उचलून धरल्याने येत्या अक्षय्य तृतीयेला म्हणजे १८ एप्रिलला गडकरी रंगायतन येथे रात्री ८:३० वाजता कॉर्पोरेट कीर्तनचा १०० वा प्रयोग सादर होत आहे. समीर लिमये यांचे गुरू मोहनबुवा रामदासी स्वत:ही या कार्यक्रमात निरूपण करणार आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमात असेल.

विविध कंपन्यांनी सीएसआर या संकल्पनेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करावेत. शाळा महाविद्यालये विशेषत: पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम खूप लाभदायक ठरू शकतो. आतापर्यंत लोकसहभागातून ही चळवळ जोर धरते. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या समर्थ विचारांना अनुसरून समीर लिमये यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

ऋषिकेश मुळे – rushikeshmule24@gmail.com