शहरांलगत असूनही कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाशी काडीमोड घेऊन परिसरातील गावांनी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपले स्वतंत्र अस्तित्त्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी नागरीकरणाचे लोण काही त्यांना थांबविता आलेले नाही. वाढत्या नागरीकरणाचे पडसाद अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही उमटले. एरवी ग्रामीण भागातील उमेदवारांचा प्रभाव असणाऱ्या ग्रामपंचायतीत यंदा शहरी वस्त्यांमधील उमेदवारही मोठया संख्यने निवडून आले आहेत. डोंबिवली शहरालगतचे आजदे गाव हे त्याचे ठळक उदाहरण. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन उच्चशिक्षित तरुण निवडून आले आहेत.
डोंबिवलीतील एमआयडीसाचा औद्योगिक तसेच निवासी विभाग या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सतरापैकी सहा उमेदवार मिलापनगर, सुदर्शननगर आणि सुदामानगरमधून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे त्यात शिशीर बोरकर हा एमबीए तरुण आणि स्मृती कुलकर्णी ही कॉस्मॅटोलॉजीचे पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेल्या तरुणीचा समावेश आहे.
आजदे गावाची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक असून येथील रहिवाशांना विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागते. औद्योगिक विभागच या गावाच्या हद्दीत असल्यामुळे प्रदूषण, खराब रस्ते, अस्वच्छता, कचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्यांनी गावाला विळखा घातला आहे. गावाच्या हद्दीतच मिलापनगर, सुदर्शनगर तसेच सुदामानगर हे एमआयडीसी निवासी विभाग येतात. हा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत नाही आणि सुविधा पुरविण्याची ग्रामपंचायत प्रशासनाची कुवत नाही. त्यामुळे सध्या या नागरी वसाहतींची ‘ना घर का न घाट का’ अशी अवस्था झाली आहे. भरीस भर म्हणून ग्रामपंचायतीत नागरी वसाहतींचे प्रतिनिधीत्त्व करणारे कुणीही नसल्याने या गावाला कुणीही वाली नव्हता. त्यामुळे कधीकाळी हा परिसर पुन्हा महापालिका प्रशासनात जाईल, याची वाट पाहण्यापेक्षा नागरी वसाहतीतील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या प्रशासनात प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रितसर शिवसेना पुरस्कृत पॅनेल उभे करून निवडणुकीत भाग घेतला. त्याला वसाहतीतील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. परिणामी नागरी वसाहतींमधून तब्बल सहा सदस्य आजदे ग्रामपंचायतीत निवडून गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा