बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेत गेल्या २०२० पासून प्रशासकीय राजवट आहे. या काळात मुख्याधिकारी आणि प्रशासक पद एकाच व्यक्तीकडे असून या कालावधीत निधीचे १० -१० लाखांचे तुकडे करून अनेक कामे केली गेली आहेत. यात कोणताही दर्जा तपासला गेला नाही. त्यामुळे अशा कामांची चौकशी करावी, अशी मागणी करत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी एकच खळबळ उडवून दिली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यावर बोलत असताना त्यांनी शिलाई मशिन आणि घरघंटी वाटपाच्या कार्यक्रमावरही आक्षेप घेत याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपामुळे बदलापुरातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका २०२० वर्षात होणे अपेक्षित होते. मात्र त्याचवेळी करोना काळात लागलेली टाळेबंदी आणि नंतर विविध कारणांमुळे रखडलेली टाळेबंदी यामुळे पाच वर्षे उलटूनही निवडणूक झालेली नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने मुख्याधिकारी यांच्याकडेच प्रशासक पदाचा कारभार आहे. त्यामुळे लोकांचा आणि पालिकेचा थेट संबंध संपलेला आहे. पालिकेचे ठराव, त्यांची मंजुरी, त्याचे होणारे काम, त्याची लेखापरिक्षण अशा गोष्टींबाबत सर्वसामान्य आणि लोकप्रतिनिधींना माहिती मिळत नाही. याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप अनेकदा दबक्या आवाजात होत होता. मात्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी याच प्रशासकीय राजवटीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. २०२० पासून प्रशासकपदाच्या काळात विविध कामात भ्रष्टाचार झाला आहे. कारभार मनमानी पद्धतीने चालतो आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक कामांची माहिती नसते. अनेकदा नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी अधिकारी उपस्थित नसतात, अशी भूमिका कथोरे यांनी बोलताना मांडली. प्रशासकांकडून सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कुणी नाही, त्याच्या तपासणीसाठी चांगले अधिकारी नाही. त्यामुळे या कामांची चौकशी करावी अशी मागणी कथोरे यांनी यावेळी केली.

त्याचवेळी प्रशासकांच्या काळात निधीचे वाटप १०-१० लाखांचे तुकडे करून केले गेले आहे. त्यातून कामाचा दर्जा राहिलेला नाही असाही खळबळजनक आरोप किसन कथोरे यांनी केला. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार कथोरे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मुरबाडमधील दिवाणी न्यायालये, पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासाठी निधी देण्याची मागणी केली.

घरघंटी, शिलाई मशिन वाटपाचीही चौकशी करा

कुळगाव बदलापूर नगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि प्रधानमंत्री खजीन क्षेत्र योजनेअंतर्गत अडीच कोटी खर्चातून शिलाई मशिन आणि घरघंटीचे वाटप महिलांना करण्यात आले होते. कोणत्याही निविदेशिवाय याचे वाटप कसे झाले, नियमभंग करून हे वाटप झाल्याने याची चौकशी करण्याची मागणी आमदार कथोरे यांनी केली. मनमानी पद्धतीने आर्थिक देवाणघेवाणीतून याचे वाटप करण्यात आल्याचाही गंभीर आरोप कथोरे यांनी केला. या उपक्रमात स्थानिक शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा पुढाकार होता. त्यामुळे कथोरे यांच्या आरोपानंतर आता बदलापुरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Story img Loader