घनकचरा पेटीवर साफसफाईसाठी नेमलेले कर्मचारी हजर नसतानाही त्यांचे पगार काढले जात आहेत आणि त्याचबरोबर वजन काटे बंदावस्थेत असल्यामुळे ठेकेदाराला कचरा वाहतुकीसाठी सरासरी रक्कमेच्या माध्यमातून जास्त देयक दिले जात आहे, असे गंभीर आरोप ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर हे चांगले काम करीत असून त्यांनी घनकचरा विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावे अन्यथा पुराव्यानिशी जनहीत याचिका दाखल करू, असा इशाराही नेत्यांनी दिला आहे. यामुळे घनकचरा विभाग अडचणीत सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या संदर्भात घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
हेही वाचा- कल्याणमध्ये मेडिकल दुकान सुरू करण्याच्या नावाने ५६ लाखांची फसवणूक
काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यात महापालिकेच्या घनकचरा विभागात कोटय़वधींचा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप केला. वर्तकनगर येथील हजेरी पेटीवर ५० कर्मचारी साफसफाईच्या कामासाठी नेमले आहेत. प्रत्यक्षात १५ कर्मचारी कामावर हजर राहत असून उर्वरित ३५ कर्मचारी गैरहजर असतात. तरिही त्यांची नियमित हजेरी लावून त्यांचे पगार काढले जात असून त्यासाठी गैरहजर राहणारे कामगार महिन्याकाठी १५ हजार रुपये खर्च करतात. ठाणे शहरात ४३ हजेरीपेटी असून त्याठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. याप्रकारामुळे महापालिकेला महिन्याला अडीच कोटींचे नुकसान सोसावे लागत असून याशिवाय २ कोटी रुपये ठेकेदाराला द्यावे लागत आहेत. असा दरमहा साडेचार कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. ऋठाणे महापालिकेत कचरा वाहतूकीसाठी वजनाप्रमाणे संबंधित ठेकेदाराला पैसे दिले जातात. परंतु कचऱ्याचे वजन करण्यासाठी असलेले काटे बंदावस्थेत असल्यामुळे ठेकेदाराला सरासरी रक्कम दिली जात आहे. ही रक्कम जास्त असल्याने कचरा वाहतूकीच्या माध्यमातून दरमहा दोन ते तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शहरात जमा होणारा कचरा सुरुवातीला सीपी तलावा जवळ आणला जातो आणि त्यानंतर तेथून तो पुन्हा उचलून दिवा येथील कचराभुमीवर टाकला जातो. कळवा, मुंब्रा हा परिसराला दिवा कचराभुमीजवळ आहे. तरीही कळवा आणि मु्ंब्रा भागातून जमा होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक सीपी तलाव येथे करण्यात येत असल्याचे दाखविली जाते. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही वाहतूक होत नसून ही वाहने थेट दिवा कचराभुमीवर कचरा टाकतात. या वाहतूकीच्या माध्यमातून महिन्याकाठी सात ते आठ कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विभागातील भ्रष्टाचाराकडे आयुक्तांनी लक्ष दिले नाहीतर पुराव्यानिशी जनहीत याचिका दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.