उल्हासनगरमध्ये दोन कर्मचारी लाच घेताना ताब्यात
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरात बांधलेल्या दोन स्वच्छतागृहांचा अहवाल पाठविण्यासाठी घरमालकाकडे सहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या उल्हासनगर पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली.
उल्हासनगर शहरातील एक रहिवाशाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजनेतून घरात दोन स्वच्छतागृहे बांधली. या बांधकामांची तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल उल्हासनगर पालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला की, घरमालकाला स्वच्छतागृहाची प्रत्येकी २२ हजार रुपयांची रक्कम मिळणार होती. उल्हासनगर पालिकेतील मुकादम महेंद्रसिंग बेनवल (५६), सफाई कामगार नरेश मकवाना हे घरमालकाच्या घरी स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याच्या कामासाठी गेले होते. घरमालकाला स्वच्छतागृहांच्या बदल्यात ४४ हजार रुपये मिळणार आहेत, हे पैसे आपल्या अहवालानंतर मिळणार असल्याने मुकादम महेंद्रसिंग व मकवाना यांनी ६ हजार रुपयांची मागणी केली.
घरमालकाने पाच हजार रुपये कर्मचाऱ्यांना देण्याचे कबूल केले आणि त्याच वेळी ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. मंगळवारी ही लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही पालिका कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक राजेश बागलकोट तपास करीत आहेत.