विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे शहर मतदारसंघामधून भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमदेवार अविनाश जाधव यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. असं असतानाच आता जाधव यांनी केळकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या स्किल इंडिया योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर आलेल्या २ कोटी २५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार भाजपाच्या आमदाराने केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. या योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या महिलांचा एक व्हिडिओ सोशल नेटववर्किंगवर पोस्ट करण्यात आला आहे.
शहरातील मनोरमा नगर आणि ठाण्यातील इतर भागातील तीन हजार महिलांचे नाव स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्किल इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत नोंदवून घेतले आणि बँकेमध्ये त्यांच्या नावाने खाती सुरु करण्यात आली. या महिलांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या महिलांच्या बँक खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झाले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे साडेसात हजार अचानक रुपये गायब झाले असा आरोप या महिलांनी केला आहे. ‘अनेकदा या महिला भाजपाचे स्थानिक आमदार संजय केळकर यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी तुम्ही आणि ते आपआपसात मिटवा असं सांगितलं. पण मोदींनी सुरु केलेल्या या योजनेचा एक पैसाही या महिलांना मिळाला नाही,’ असा आरोप जाधव यांनी केला आहे.
‘भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आले त्यांनी मोदी तुम्हाला उद्योग सुरु करायला मदत करतील असं सांगत स्किल इंडिया योजनेखाली आम्हाला तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले. मी स्वत: हजार महिलांना गोळा केले. आम्ही सर्वांनी बँकेत खाते सुरु केले. काहींना घरी पासबुक आले तर काहींनी पोस्टाने आले. महिलांना पैसे आले आणि एका रात्रीत ते पैसे गायब झाले. त्या महिलांना मी पैसे खाल्ले असं वाटलं. मी आमदार संजय केळकर यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला यातलं काही माहित नाही असं उत्तर दिल्याचे या महिला व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांने आमच्याकडे सह्या करुन घेतल्याचेही या महिलांनी व्हिडिओमध्ये सांगतले आहे.
‘पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जर प्रशिक्षणाचे पैसे असतील तर ते थेट संबंधितांकडे जायला हवे होते. पण आमच्या खात्यावर येऊन ते पैसे अचानक गायब झाले म्हणजे त्यांनी आमचे पैसे खाल्ले आहेत,’ असा आरोप या महिलांनी भाजपा पदाधिकाऱ्यांवर केला आहे.
भाजपाकडून ठाण्यात झालेला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी केला आहे. “सरकारी योजनेअंतर्गत तीन हजार महिलांच्या खात्यावर आलेले प्रत्येकी साडेसात हजार रुपये काढून घेण्यात आले. या महिलांसहीत पोलीस स्थानकात जाऊन या प्रकरणात मी तक्रार दाखल करणार आहे,” असं जाधव यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच ‘तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळवून देईल हा माझा शब्द आहे’ असं आश्वासन जाधव यांनी या महिलांना दिलं आहे.
दरम्यान, १९ तारखेला ठाण्यात होणाऱ्या मनसेच्या सभेत या महिलांची भेट राज ठाकरेंशी घडवून देणार आहेत. “राज ठाकरेंसमोर तुम्ही १९ तारखेला आपले म्हणणे मांडा,” असंही अविनाश जाधव यांनी या महिलांना सांगितलं आहे.