ऐन दिवाळीत पगार रखडल्याने कुटुंबाची जशी अवस्था होते, तशीच काहीशी परिस्थिती कामांची बिले रखडल्याने अंबरनाथमधील नगरसेवकांची झाली आहे. निवडणूक प्रचारात उमेदवाराने अतिरिक्त खर्च टाळावा यासाठी निवडणूक आयोग विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. मात्र अंबरनाथमध्ये या ‘गरीब’नगरसेवकांना ऐन निवडणुकीच्या काळातच पैशाची चणचण निर्माण झाली. शहरातील किमान दहा ते पंधरा लोकप्रतिनिधी अप्रत्यक्षपणे ठेकेदार आहेत. शहरात दिवाळीनंतर निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात रस्ते काँक्रिटीकरणाची कामे झाली. निवडणुकीआधी त्या कामांची बिले मिळतील, अशी नगरसेवकांची अपेक्षा होती. मात्र पालिकेच्या नव्या अर्थसंकल्पीय तरतुदीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यात आता निवडणूक आचारसंहिता लागल्याने बिले काढता येणार नाहीत. त्यामुळे हे नगरसेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदारांची सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. त्यात सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवक ठेकेदारांचा समावेश आहे. राखीव प्रभाग झालेल्या बहुतेक सर्व प्रस्थापित नगरसेवकांनी आपल्या पत्नीस अथवा कट्टर समर्थकास तिकीट देऊन सत्तेच्या चाव्या आपल्या हातीच ठेवण्याची व्यूहरचना केली आहे. मार्चअखेरीला बिले निघाली, की निवडणुकीत मनासारखा खर्च करता येईल, असे मनसुबे त्यांनी आखले होते. मात्र बिले रखडल्याने ऐन प्रचारात या लोकप्रतिनिधींना पैशाची चणचण भासू लागली आहे.
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या र्निबधानुसार प्रत्येक नगरसेवक जास्तीतज्ोास्त तीन लाख रुपये खर्च करू शकतो. प्रत्यक्षात काही प्रभागांमधील अटीतटीच्या लढतीत हा खर्च २० ते २५ लाख रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader