ठाणे – कौटुंबिक हिंसा, छळ, मारहाण अशा विविध प्रकरणांनी महिला त्रस्त असतात. अनेकदा या प्रकरणांमुळे त्यांची मनस्थिती बिघडते. अशा वेळी या महिलांना समुपदेशनाची सर्वाधिक गरज असते. यासाठी ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत पाच समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या प्रत्येक केंद्रावर महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणुक करण्यात आली आहे.
कुटूंबातील छळ, हिंसा आणि मारहाणीने पिडीत असलेल्या महिलांवर मानसिक ताण येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून ठाणे जिल्ह्यात पाच समुपदेशन केंद्राची उभारणी केली आहे. या केंद्रात तज्ज्ञ व्यक्तीकडून पिडीत महिलांना समुपदेशन केले जाते. समूपदेशन करण्यापूर्वी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी पीडित महिलांची समस्या जाणून घेतात. त्यानंतर, तज्ज्ञ व्यक्तीकडून महिलांच्या समुपदेशनासह त्यांच्या समस्येवर कायदेशीर मार्ग कोणता आहे याबाबत सल्ला दिला जातो.
हेही वाचा >>>Natasha Awhad: “… म्हणून मविआला ५० च्या खाली रोखलं” जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विधानसभा निकालावर खळबळजनक दावा
महिलांना सल्ल्यासह कायदेशीर मदत, मानसोपचार तज्ज्ञांची मदत, पोलिसांची मदत मिळवून दिली जाते. जिल्ह्यात ठाणे, कल्याण, शहापुर, अंबरनाथ आणि मुरबाड याठिकाणी हे पाच समुपदेश केंद्र आहेत. महिला व बालविकास विभागामार्फत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महिलांसाठी विशेष योजना अंतर्गत पीडित महिला आणि मुलींना आधार देण्याच्या उद्देशाने समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीडित महिलांनी या समुपदेशन केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
कुठे आहेत समुपदेशन केंद्र
कौंटुबिक समुपदेशन केंद्र भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिती), सार्वजनिक बांधकाम विभाग दुसरा मजला, ठाणे (प)
कौंटुबिक समुपदेशन केंद्र भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिती), महिला व बाल सहाय्य केंद्र पंचायत समिती कार्यालय पहिला माळा, कल्याण
महिला विकास केंद्र संस्थेचे समुपदेशन/ सल्लागार केंद्र, एकात्मक बाल विकास सेवा योजना, पंचायत समिती शहापुर, जि. ठाणे
आश्रय महिला संस्था ,तहसिल कार्यालय बिल्डींग, अंबरनाथ पंचायत समिती कार्यालय, 3 रा मजला, के. बी. रोड, अंबरनाथ, जि. ठाणे
वननिकेतन संस्थेचे चेतना महिला समुपदेशन व कुटुंब सल्ला केंद्र सरकारी दवाखान्या शेजारी ता. मुरबाड जि. ठाणे