डोंबिवली-येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला प्रसूती विभागातील महिला रुग्णांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मागील १०० दिवस राबविला. या उपक्रमाला शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, रुग्ण नातेवाईकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून हा उपक्रम एक हजार दिवस राबविणार आहोत, असे डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा आणि ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी सांगितले.
संस्थेतर्फे करण्यात आलेल्या समुपदेशन उपक्रमाला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शास्त्रीनगर रुग्णालयात एका कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पालिकेच्या साथ रोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल, डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डाॅ. स्वाती गाडगीळ उपस्थित होते.
हेही वाचा >>> ठाणे : काळू धरण नकोच, फसवणुकीच्या भावनेतून धरण क्षेत्रातील ग्रामस्थांचा मुरबाडमध्ये मोर्चा
पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात बहुतांशी सामान्य, दुर्बल घटकांमधील महिला प्रसूतीसाठी येतात. प्रसूतीनंतर या महिलांना पालिकेच्या डाॅक्टर, परिचारिकांकडून योग्य ती वैद्यकीय सुविधा दिली जाते. सामान्य घरातून आलेल्या अशा महिलांचे समपुदेश होणे गरजेचे असल्याने मागील काही महिन्यांपासून डोंबिवली विमेन्स सोसायटीच्या डाॅ. गाडगीळ आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या रुग्णालयात प्रसूती विभागातील महिलांचे समुपदेशन करत आहेत. मुलगाच पाहिजे हा हट्ट आणि मुलगी झाली तर कुटुंबाची नाराजी. याविषयी असलेले अज्ञान दूर करुन महिलांची मानसिकता बदलावी या विचारातून हा समुपदेशनाचा कार्यक्रम १०० दिवस सुरू होता.
महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. मुलगी झाली तरी ती आपला कुटुंबप्रमुख आहे या भावनेतून मुलीकडे बघा. तिला शिक्षण द्या. मोठी झाल्यावर नोकरी करताना तीच कुटुंबाची मोठी आधार असते, असे समुपदेशन विमेन्स फोरमच्या सदस्यांकडून रुग्ण महिलांना केले गेले. त्याचा चांगला परिणाम रुग्णालय प्रशासन, परिचारिका आणि संस्था सदस्यांना दिसून आला. प्रसूतीसाठी आलेल्या अनेक महिलांच्या कुटुंबीयांनी या मार्गदर्शन कार्यक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे हा समुपदेशनाचा कार्यक्रम पुढील एक हजार दिवस करण्याचा निर्णय विमेन्स सोसायटीने घेतला आहे, असे डाॅ. गाडगीळ यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे : डोंबिवलीत ६५ बेकायदा बांधकामे, पालिकेचा ‘ईडी’ला पाठवायचा अहवाल सज्ज
रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सुविधा वेळेत दिली जाते. त्याच बरोबर असे समुपदेशनाचे कार्यक्रम होत असल्याने प्रबोधनाचे काम वैद्यकीय सुविधेबरोबर होते. ही समाधानाची बाब आहे. असे कार्यक्रम नियमित केल्याबद्दल डाॅ. पानपाटील, डाॅ. शुक्ला यांनी विमेन्स सोसायटीच्या सदस्यांचे कौतुक केले.
अनेक परिचारिका आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्याही या चांगल्या कामासाठी योगदानासाठी सज्ज होतील, असा विश्वास परिचारिकांनी व्यक्त केला. प्रा. संगीता पाठक यांच्या संकल्पनेतून मुलींवर होणाऱ्या अन्यायाचे पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.