ठाणे : भिवंडीत कत्तल केलेल्या म्हैशी आणि रेड्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून बनावट तूप बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे तूप मोठ्या खानावळी, उपाहारगृहांना विक्री केला जात होता. महापालिकेने बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डबे आणि कढई असे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती भिवंडी महापालिका प्रशासनाने दिली. भिवंडी येथील भोईवाडा भागात इदगाह साल्टर हाऊस हा बंद कत्तलखाना आहे.
हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात शाळा वाहतूक ठप्प होण्याची भिती; शाळांच्या बसगाड्यांमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा
या कत्तलखान्यात कापण्यात आलेले म्हैस आणि रेड्यांचे उरलेले अवशेष टाकले जाते. हे अवशेष गोळा करून त्यामधील चरबी काढून ती सुकविली जात होती. तसेच त्यापासून तूप बनविले जात असल्याच्या तक्रारी भिवंडी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या माहितीच्या आधारे, महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांचे पथक आणि आपत्कालीन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाड मारली. कारवाई दरम्यान तेथे तूप कढविण्याची भट्टी सुरू असल्याचे आढळून आले. पालिका कर्मचाऱ्यांनी कढई मधील साहित्य ओतले. तसेच बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डबे आणि कढई असे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती भिवंडी महापालिका प्रशासनाने दिली.