कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील हनुमान मंदिराजवळ काही वर्षापासून घरगुती पध्दतीने सुरू असलेला देशी, विदेशी मद्याचा अड्डा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी उदध्वस्त केला. या अड्ड्यावर दिवस, रात्र ग्राहक मद्य खरेदी, सेवन करण्यासाठी यायचे. मद्य पिऊन या भागात धिंगाणा घालायचे. यामुळे रात्रीच्या वेळेत शांततेचा भंग होत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवीचापाडा येथे हनुमान मंदिरच्या मागे चिमण पाटील निवासात घरासमोर निवारा बांधून त्यामध्ये हाॅटेल पध्दतीने मद्य अड्डा चालक मच्छिंद्र चिमण पाटील (४०) यांनी देशी, विदेशी मद्याचा अड्डा सुरू केला होता. दिवस, रात्र या अड्ड्यावर ग्राहक मद्य सेवन, खरेदीसाठी येत होते. मद्य पिऊन झाल्यावर या भागात ग्राहकांमध्ये भांडण होऊन ते तेथेच आपसात मारामाऱ्या, गोंधळ घालत होते. रात्रीच्या वेळेत या गोंधळाचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत होता.

या अड्ड्यावर विष्णुनगर पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली होती. तरीही मच्छिंद्र पाटील यांनी पुन्हा हा अड्डा सुरू केला होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अड्डा चालकाने एका शेजाऱ्याशी वाद घातला होता. गेल्या आठवड्यात पोलिसांनी सत्यवान चौकातील एका जुगार अड्डा बंद केला. त्यामुळे मद्य अड्डा बंद होईल असे रहिवाशांना वाटले होते. पाटील यांनी आपला मद्य अड्डा सुरूच ठेवला होता. याविषयीच्या तक्रारी उपायुक्त झेंडे यांच्यापर्यंत काही जागरूक नागरिकांनी केल्या होत्या.

या तक्रारींची गंभीर दखल घेऊन उपायुक्त झेंडे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना देवीचापाडा येथील मद्य अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

बुधवारी दुपारी साहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, लोखंडे, हवालदार शकील जमादार यांनी मच्छिंद्र पाटील यांच्या मद्य अड्ड्यावर छापा टाकून तो अड्डा उदध्वस्त केला. या अड्ड्यावरून पोलिसांनी इम्पिरिअल ब्ल्यु सुपेरिअर ग्रीन व्हिस्की, मॅकडाॅवेल सुप्रीम व्हिस्कीच्या बाटल्या जप्त केल्या. याशिवाय देशी दारू जप्त केली. मद्य विक्रीचा परवाना चालकाकडे नव्हता. पोलिसांनी हा अड्डा उदध्वस्त केला. परवाना नसताना बेकायदा मद्य विक्री केली म्हणून पोलिसांनी अड्डा चालक मच्छिंद्र चिमण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीसही बजावण्यात आली. साहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत. उपायुक्त झेंडे, वरिष्ठ निरीक्षक पवार यांनी तत्परतेने ही कारवाई केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.