डोंबिवली पूर्व भागातील पिसवली गावात पती-पत्नीने एका महिलेला १८ लाख रुपयांना घर विकले. तेच घर तिने इतर ग्राहकाला विकून स्वताचा लाभ करुन मूळ घर खरेदीदाराची फसवणूक केली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र प्रताप सिंग (५५), सुमित्रा रवींद्र सिंग (५०, रा. वैष्णवी हायलाईफ, रिजेन्सी पार्कजवळ, चक्कीनाका, कल्याण पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत. पिसवली गावात शिवाजीनगर मध्ये राहणाऱ्या बसंती महेंद्र पिल्लई यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची घसरगुंडी, तुटलेले पेव्हर ब्लाॅक, लाद्यांचा प्रवाशांना फटका

पोलिसांनी सांगितले, रवींद्र सिंग आणि त्यांची पत्नी सुमित्रा यांनी पिसवली गावातील अनिल मांझी यांच्या मालकीच्या जागेवर असलेल्या चाळींमधील खोली तक्रारदार बसंती पिल्लई यांचा विश्वास संपादन करुन त्यांना देण्याचे आमिष दाखविले. या खोलीच्या बदल्यात १८ लाख रुपये बसंती यांच्याकडून उकळले. कमी किमतीत घर मिळत असल्याने बसंती यांनी हा व्यवहार झटपट पूर्ण केला. बसंती यांनी खरेदी केलेल्या जागेत राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना ती खोली जमीन मालक अनिल मांझी असल्याचे समजले. हीच खोली सिंग दाम्पत्याने अन्य एकाला विकून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. अशाप्रकारे एक घर दोन जणांना फसवणूक करुन विकल्याने बसंती यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple cheats for rs 18 lakh to woman homebuyer sells same flat to 2 buyers in dombivali zws