कल्याण : मध्य रेल्वेच्या टिटवाळा-खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शनिवारी सकाळी एका मालगाडीचे कपलिंग तुटले. दोन्ही बाजुचे डबे साठ फूट एकमेकांपासून अलग झाले. लोकोपायलट-गार्डच्या हे लक्षात येताच मालगाडी तातडीने थांबविण्यात आली. अर्धा तासात कपलिंग जोडून मालगाडी मार्गस्थ झाली.
या अर्धा तासाच्या कालावधीत कसाराकडे जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरात थांबविण्यात आल्या होत्या. तातडीने बिघाड दुरुस्त करण्यात आल्याने लोकल, लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. सुरुवातीला लोकल अर्धा तासाने उशिराने धावत होत्या. त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे लोकल सेवा सुरू झाली. सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक मालगाडी मुंबईकडून माल घेऊन नाशिक दिशेने चालली होती. टिटवाळा-खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत असताना मालगाडीच्या मध्यावरील दोन डब्यांमधील कपलिंग तुटले. कपलिंग तुटताना दोन्ही बाजुच्या डब्यांना जोरदार हिसका बसला. दोन्ही बाजुचे डबे एकमेकांपासून साठ ते सत्तर फूट अलग झाले.
हेही वाचा >>> अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरात भटक्या श्वानांचा उच्छाद; तब्बल ५२ जणांना चावा
मालगाडी भरधाव नसल्याने डबे इंजिन नसताना रुळावरुन घसरले नाहीत. जेवढी गती होती तेवढ्या गतीपर्यंत डबे जाऊन थांबले. लोकोपायलटला कपलिंग तुटल्याची जाणीव झाली. खडवली, टिटवाळा रेल्वे स्थानकातून तातडीने तंत्रज्ञ घटनास्थळी आले. लोकोपायलट, गार्ड यांच्या उपस्थितीत त्यांनी कपलिंग जोडून मालगाडी नाशिक दिशेने रवाना झाली. या कालावधीत लोकल, एक्सप्रेस गाड्यांचा अर्धा तास खोळंबा झाला, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. अर्धा तासानंतर कसाराकडून येणाऱ्या, जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत धावत होत्या.