राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर हिणकस लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने झटका दिला आहे. केतकी चितळेने केलेला जामिनाचा अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. केतकी चितळेने काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीनासाठी अर्ज केला होता. अर्ज फेटाळल्याने केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केला होता. याप्रकारानंतर तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला अटक केली होती.
ठाणे न्यायालयाने सुरूवातीला तिला पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर केतकी चितळे हिने वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर सोमवारी ठाणे न्यायालयात सरकारी वकिलांनी आणि केतकीच्या वकिलांनी युक्तीवाद केला.
हेही वाचा : केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, अॅट्रॉसिटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
याप्रकरणात दबावाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून केतकीला जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केतकीच्या वकिलांनी केला. तर, सरकारी वकिलांनीही त्यांचे म्हणणे मांडले. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी गुरुवारी निर्णय देत तिचा जामीनअर्ज फेटाळला आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढल्या आहेत. या निर्णयाविरधात सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती केतकीच्या वकिलांनी दिली.