कल्याण – बनावट सात बारा उताऱ्याच्या आधारे खरेदीखत, डोंबिवलीत आयरे भागात (कोपर पूर्व रेल्वे स्थानक) ६५ महारेरा प्रकरणातील साई गॅलेक्सी या बेकायदा इमारतीच्या उभारणी प्रकरणातील मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक रतन भगत यांच्यावर तहसीलदारांच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी शालीक रतन भगत यांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी कल्याण न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

आता ते वरिष्ठ न्यायालयातून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणाची शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती या महसूल विभागाचे बनावट सात बारा उतारे, फेरफार, बिनशेती आदेश, पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्यांच्या आधारे उभारल्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाने बनवाट कागदपत्र तयार करणाऱ्या भूमाफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे डोंबिवलीचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

वरिष्ठांच्या आदेशावरून तहसीलदार सचिन शेजाळ यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले होते. मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल, तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत मे. साई डेव्हलपर्सचे शालिक रतन भगत यांनी मौजे आयरे येथील वसंत गौतम यांच्या नावे असलेल्या कुळ कायद्याच्या जमिनीचा बनावट सात बारा उतारा तयार केला. या उताऱ्याच्या आधारे खरेदीखत दस्त नोंदणीकृत केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शालिक भगत यांनी गुन्हेगारी कटकरस्थान रचून महसूल विभागाची बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केली आहे. म्हणून तहसीलदार शेजाळ यांनी शालिक भगत यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात रामनगर पोलिसांना दिले होते. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी शालिक भगत यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला. पोलीस आणि महसूल विभागाने याप्रकरणातील म्होरक्यांच्या अटकेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

तपास ठाण्याकडे

कल्याण परिमंडळात ६५ महारेरा प्रकरणातील गुन्ह्याचा सक्षमपणे तपास करतील असे वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना हा गुन्हा ठाण्यातील आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने अनेक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच प्रकरणातील गु्न्हे शाखेच्या यापुर्वीच्या ‘एसआयटी’ सारख या तपासाचे होऊ नये अशी नागरिकांची इच्छा आहे.

६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई पोलिसांनी करावी. याप्रकरणातील ‘आक्का’ पोलसांनी शोधावेत. त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहणार आहे.- दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट, डोंबिवली.

Story img Loader