भगवान मंडलिक
कल्याण– कमी कष्टात आणि कमी खर्चात ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात लागवड करता यावी म्हणून जिल्हा कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी ‘सगुणा राईस लागवड तंत्रज्ञाना’ने (एसआरटी) भात लागवडीस सुरूवात केली आहे. नवखी असलेली या पध्दतीचा शेतकऱ्यांनी अधिक संख्येने अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ही लागवड केल्यानंतर भात रोपातील हिरवी काडी खेकड्यांकडून रात्रीच्या वेळेत खाल्ली जात असल्याने शेतकऱ्यांना या खेकड्यांचा बंदोबस्त कसा करायचा असा प्रश्न आहे.मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी कमी खर्च, खूप मजुरी न घालविता, कमी कष्टात सगुणा राईस तंत्रज्ञानाने एकदाच भात लागवड होत असल्याने या लागवडीला प्राधान्य दिले आहे.
या लागवडीचा शेतकऱ्यांनी अधिक पध्दतीने अवलंब करावा म्हणून कृषी विभाग कोकण विभागाचे सहसंचालक डाॅ. अंकुश माने, ठाणे जिल्हा कृषी अधिकारी दीपक कुटे, विकास अधिकारी सारिका शेलार, सचीन थोरवे, तालुका कृषी अधिकारी प्रयत्नशील आहेत. गावागावांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी, साहाय्यक यांनी ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन दिले. ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी एस.आर. टी. या नव्या तंत्रज्ञानातून भात लागवडीला पसंती दिली आहे.एस. आर. टी. तंत्रज्ञानाने भात बियाण्याचे शेतात रोपण केल्यानंतर आठवडाभरात बियाण्याचे रोप तयार होते. एका रोपामध्ये सात ते आठ भाताच्या काड्या तयार होतात. या काड्या रात्रीच्या वेळेत खेकडे तोडून खातात. एकदा रोप वर आल्यानंतर ते खेकड्याने खाल्ले की पुन्हा त्या जागी रुजवण होत नाही. खेकड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना हमला, आरसीपेटा कीटकनाशकांचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या औषधांनाही खेकडे दाद देत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा >>>कल्याण: विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पत्नीची छेड काढल्याने हाणामारी
काही शेतकरी रात्रीच्या वेळेत शेतामध्ये बॅटऱ्या, पलिते घेऊन जातात. शेतामधील खेकडे पकडून ते पोतडीत टाकतात. अशाप्रकारे ५० हून अधिक खेकडे पकडले की ते दूर डोंगर भागात किंवा नदी, ओढ्याच्या काठी नेऊन सोडतात. या माध्यमातूनही शेतामधील खेकड्यांचे प्रमाण ७० टक्के कमी झाले आहे, असे मुरबाड, शहापूर तालुक्यातील शेतकरी सांगतात.खेकडा हा निसर्ग जैवविविधतेमधील एक घटक आहे. हंगामाप्रमाणे हा जीव चिखल पाण्यात वावरत असतो. शेतकऱ्यांनी अति उग्र, प्रभावी कीटकनाशकांचा किंवा कारवाईचा वापर न करता नैसर्गिक पध्दतीने खेकड्यांचा बंदोबस्त करावा. कृषी विभागाने निश्चित केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. प्रभावी कीटकनाशके वापरली तर त्यामुळे जलस्त्रोत प्रदुषित होतात. काळजी घेऊन नैसर्गिक पध्दतीने खेकडा अस्तित्वात राहिल अशा पध्दतीने या जीवाचा बंदोबस्त करावा, असे आवाहन कृषी कोकण विभागाचे सहसंचालक डाॅ. अंकुश माने यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कोपर रेल्वे स्थानकात फलाटावर निवारा नसल्याने प्रवाशांना जिन्याचा आधार
‘एसआरटी’ तंत्रज्ञान
पाऊस सुरू होण्यापूर्वी शेतकऱी ट्रॅक्टरने शेत उखळून घेतो. शेतामधील माती समतल केली जाते. वळवाचा पाऊस पडल्यानंतर मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात साचेबध्द अंतराने लोखंडी सांगाड्याने शेतात ठराविक अंतराने भात बियाणे रोपण केले जाते. भाताची रोप पाऊस सुरू झाली की चार ते पाच दिवसात वाढायला सुरूवात करतात. या तंत्रज्ञानात एकदा भात लागवड केल्यानंतर रोपे पुन्हा उपटून चिखलणी करुन ती लावण्याची गरज नसते. एकदा रोपणी केली की तीन महिन्यांनी भाताला दाण्यांचा तुरा आला की त्याची कापणी करायची आहे.
“ जिल्ह्यात एस.आर.टी. तंत्रज्ञानाने भात लागवडीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या लागवडीला शेतकऱ्यांची पसंती मिळू लागली आहे. या लागवडीनंतर खेकडा किंवा अन्य जिवांचा भात रोपांना उपद्रव होऊ नये म्हणून आरसीपेटा कीटकनाशकाचा वापर करावा. त्यामुळे खेकड्यांचे शेतामधील प्रमाण कमी होते.”-दीपक कुटे,जिल्हा कृषी अधिकारी,ठाणे.
( ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाने शहापूर तालुक्यात करण्यात आलेली भात लागवड.)