डोंंबिवली – डोंबिवली एमआयडीसीत जीमखाना रस्त्यावर मागील दोन महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडून तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर तडे पडले आहेत. हे काम निकृष्ट पद्धतीने ठेकेदाराकडून करण्यात आल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी या कामाला आक्षेप घेतला. हे काम नव्याने करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
ठेकेदाराने दोन महिन्यांपूर्वी तयार केलेला डोंबिवली जीमखान्यासमोरील सिमेंट काँक्रिटचा नवीन रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदून गैरसोय केल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक, या रस्त्याच्या दोन्ही भागात राहणारे रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी नवीन रस्ता तयार होणार म्हणून नागरिकांनी वाहन कोंडीचा त्रास सहन केला. आता पुन्हा रस्त्याला तडे गेले म्हणून ठेकेदाराने रस्ता दोन दिवसांपूर्वी काँक्रीटचा रस्ता खोदला आहे.
हेही वाचा – श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता
स्थानिक रहिवाशांनी या खोदकामाला आक्षेप घेतला. त्यावेळी ठेकेदाराने काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेले होते. हे काम निकृष्ट पद्धतीने झाले असल्याचा ठपका ठेवत ते नव्याने करण्यास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती ठेकेदाराने स्थानिक रहिवासी ॲड. श्रीरंग परांजपे यांना दिली.
अगोदरच हे काम मजबूत केले असते तर हे काम तोडण्याची वेळ आली नसती. यामध्ये करदात्या नागरिकांचा पैसा पाण्यात गेला आहे. या कामाला जबाबदार ठेकेदार आणि नियंत्रक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे.
आमदार पाटील यांनीही डोंबिवली जीमखान्यावरील नवीन कोरा काँक्रीटचा रस्ता खोदल्याने तीव्र नापसंती व्यक्त करून यामध्ये करदात्यांच्या पैशाचा चुराडा होत आहे हे या रस्त्याच्या नियंत्रकांना माहिती आहे की नाही, असा प्रश्न करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अधिक माहितीसाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एमएमआरडीएचे बहुतांंशी ठेकेदार राजकीय आशीर्वादाने डोंबिवलीत काम करत आहेत. त्यामुळे त्यांना कोणी काही बोलले की ते थेट डोंबिवली नियंत्रक वजनदार राजकीय नेत्याला संपर्क करून चुका काढणाऱ्या अधिकाऱ्याचे कान उपटण्यास सांगत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या रस्ते कामांविषयी पालिका, एमआयडीसी अधिकारी दोन हात दूरच राहत आहेत.
हेही वाचा – शिवसेनेचा मुरबाड मतदारसंघावर दावा, वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारीसाठी वरिष्ठांकडे साकडे
डोंबिवलीत काँँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. या कामांवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत. पालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांना या रस्तेकामांविषयी एमएमआरडीए अधिकारी, ठेकेदार विश्वासात घेत नाहीत. फक्त राजकीय दबाव आणून त्रृटी दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना बेजार केले जाते. हे चूक आहे. – प्रमोद पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण.
दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली जीमखानासमोरील रस्ता काँक्रीटचा करण्यात आला. आता तो रस्ता निकृष्ट म्हणून ठेकेदाराकडून फोडण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जनतेचा पैसा फुकट जात आहे. याचे भान शासकीय अधिकाऱ्यांनी ठेवावे. – ॲड. श्रीरंग परांजपे, रहिवासी, एमआयडीसी.