भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण- ठाणे जिल्ह्याचा भूभाग डोंगराळ आणि भूस्तर माती, खडकाचा आहे. या भागात रस्ते, खोदकाम, आव्हानात्मक उंच डोंगराळ भागात करताना पहिले माती, त्यानंतर अखंड पाषाण लागतात. उन्हाळ्यात अशा आव्हानात्मक भागात काम करणे अवघड नसते. पावसाळ्यात डोंगराची माती भुसभुशीत, चिकट झालेली असते. या चिकट मातीवर अवजड वस्तू ठेवली की पाषाणाच्या स्तरापर्यंत ती स्वताला रोखून नंतर क्षमता संपली की ती अवजड वस्तूला सोडून देते. याच कारणामुळे शहापूर जवळील खुटाडी-सरळांबे परिसरात समृध्दी महामार्गावर काम करताना अपघात झाला असावा, असा प्राथमिक तर्क भूगोल शास्त्राच्या अभ्यासकांनी वर्तविला.
हेही वाचा >>> डोंबिवलीत घर खरेदीत १८ लाखाची फसवणूक
नाशिकपासून ते घोटी, सिन्नर आणि पुढील समृध्दी महामार्गाचा पट्टा हा घाट माथ्यावरील भाग आहे. या भागातील जमीन चिकट, पाषाणाचे अस्तित्व कमी असलेली आहे. त्यामुळेच नागपूर ते शिर्डीपर्यंतची समृध्दी महामार्गाची कामे गतीने झाली. इगतपुरी, कसारा घाटापासून ते समृध्दी महामार्गापर्यंतचा ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील भाग उंच पहाडी भागातून आहे. शहापूर, कल्याण तालुक्यात समृध्दी महामार्गाची कामे करताना ठेकेदाराला पहाडी भाग, अखंड पाषाणातून कामे करताना आव्हानात्मक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
समृध्दी महामार्गाचा १२ किमीचा एक टप्पा शहापूर तालुक्यातील भातसा धरणा जवळील सरळांबे, वाशाळा ते इगतपुरी भागातून कसाराकडे जात आहे. या भागात सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. ठाणे जिल्ह्यातील समृध्दी रस्ते उभारणीचा हा सर्वात खडतर टप्पा आहे. कल्याण, शहापूरकडून समृध्दी महामार्गाने नाशिककडे जाणारी वाहने रस्ते, बोगदे मार्गाने सरळांबा गावापर्यंत जमीनस्तरावरुन सपाटीवरुन धावतील. ही वाहने त्यानंतर वाशाळा ते इगतपुरी हा कसारा घाटातील अवघड चढ चढण्यासाठी २७५ फूटाच्या उंच पूल, दरी, बोगद्यांमधून नाशिककडे मार्गस्थ होणार आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची घसरगुंडी, तुटलेले पेव्हर ब्लाॅक, लाद्यांचा प्रवाशांना फटका
या डोंगर दरीत मुसळधार पाऊस कोसळतो. त्याच बरोबर सतत पावसाची रिपरिप सुरू असते. पावसाळ्यात या भागातील आव्हानात्मक काम राज्य रस्ते महामंडळाने थांबविले आहे. पावसाने उघडीप दिल्यावर ही कामे हाती घेतली जाणार आहेत, असे महामंडळाने जाहीर केले आहे. सरळांबे खुटाडी गावाजवळ समृध्दी महामार्गाचे काम करताना खूप आव्हानात्मक परिस्थिती नसल्याने महामंडळाच्या ठेकेदाराने याठिकाणी काम सुरू ठेवले होते.
महामार्गाचे काम करताना सतत उत्खनन, खडकांची तोडफोड, त्याचे हादरे आणि शक्तिशाली अवजड यंत्रसामुग्री यांची सततची धडधड असते. रस्ते कामासह लगतची माती, खडक हादरे बसून मोकळे होत असतात. पावसामुळे लगतच्या भागाला भेगा गेलेल्या असतात. त्यात पावसाचे पाणी मुरते. त्यामुळे जमीन अधिक भुसभुशीत होते. अशा ठिकाणी पावसाळ्यात अवजड यंत्र सामुग्री घेऊन काम सुरू केले की दुर्घटना घडतात, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. पावसाळ्यात अशा आव्हानात्मक परिस्थितीत कामे करताना खूप सतर्कता, काळजी घ्यावी लागते. तशी काळजी खुटाडी भागात समृध्दीचे काम करताना घेतली गेली नसावी म्हणून कामगारांना जीव गमावावे लागले. यापुढे अवघड डोंगराळ भागात कामे करताना कोणती, कशी काळजी घ्यायची हा धडा आहे, असे या जाणकाराने सांगितले.