लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बुधवारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन केली. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने अशाच स्वरूपाची मागणी केली होती. या निमित्ताने दिवा पोलीस ठाण्याची मागणीने पुन्हा जोर धरल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत येत असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या सहा लाखाच्या पुढे गेली आहे. या परिसरातील नागरिकांसाठी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी उभारण्यात आलेली आहे. या पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी अवस्था दिवा चौकीचे असून दिव्यातील लोकांना तक्रार करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटरवर असलेल्या मुंब्रा पोलीस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी होत आहे. अशा स्वरूपाची मागणी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने केली होती. त्यापाठोपाठ भाजपचे दिव्यातील स्थानिक नेते आणि ठाणे शहर चिटणीस विजय भोईर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना दिवा पोलीस ठाणे उभारणीच्या मागणीसाठी निवेदन दिले. यावेळी भाजपचे माजी गटनेते आणि नगरसेवक मनोहर डुंबरे, सुरेश चौधरी, अजित सानप हे उपस्थित होते. दिव्यातील गुन्हेगारी, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी आणि दिवावसीयांच्या सुरक्षेबाबत आयुक्त डुंबरे यांचे प्रयत्न सुरु असून याबाबत आयुक्त डुंबरे यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत जाणवले, असे भोईर यांनी सांगितले.
आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद
या भेटीदरम्यान, दिव्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तसेच ६ लाखाच्या पुढे गेलेल्या लोकसंख्येला सध्याचे पोलिस बळ कसे अपुरे पडत आहे, हे आयुक्त डुंबरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यास आयुक्त डुंबरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पोलीस ठाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालतो असा शब्द आयुक्त डुंबरे यांनी दिला. तसेच याबाबत त्यांच्या यंत्रणेला ताबडतोब फोन करून सूचना दिल्या, असे माहिती विजय भोईर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने केली होती अशीच मागणी
दिवा परिसरातील नागरिकांसाठी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी उभारण्यात आलेली आहे. या पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. चरस, गांजा,हकीम यासारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी आधीन जाताना दिसत आहेत. महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. चोरी, दरोडे यासारखे प्रकार दिव्यात सरसपणे होताना दिसत आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने काही दिबसांपूर्वी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली होती.