डोंबिवलीतील शीळफाटा रस्त्यावरील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील इगो लेडीज सर्व्हेिस बारवर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री छापा टाकून बार चालकासह २६ महिला सेविका, १८ पुरुष यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांच्या आदेशावरुन बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मानपाडा पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई केली. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत एकूण सुमारे ५० हून अधिक बार आहेत. उपायुक्त गुंजाळ यांच्याकडे शिळफाटा रस्त्यावरील ईगो लेडीच बारमध्ये महिला सेविका हिंदी, मराठी गाण्यांवर अश्लिल, बिभत्स नृत्य करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ही नृत्य करण्यास ग्राहक प्रोत्साहित करत असल्याची माहिती उपायुक्त गुंजाळ यांना प्राप्त झाली होती.
उपायुक्तांनी ही माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते यांना दिली. रुपवते यांनी हवालदार अरुण आंधळे, संतोष शेडगे, रामदास फड यांचे छापा पथक तयार केले. सुरुवातीला ही माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली नाही. ईगो बारवर छापा टाकण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक निघाल्यावर मानपाडा पोलिसांना रुणवाल सीटी गार्डन संकुलासमोर बोलावून घेण्यात आले. त्यांना छाप्याची आयत्यावेळी माहिती देण्यात आली.
हेही वाचा >>>सध्याच्या काळात बुद्धिवाद्यांचा तिरस्कार!; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे मत
शनिवारी रात्री आठ वाजता छापा पथकातील दोन हवालदार बनावट ग्राहक बनून इगो लेडीज बारमध्ये गेले. तेथे त्यांना २६ महिला सेविका, १८ ग्राहक लैला ओ लैला या गाण्यावर अश्लिल, बिभत्स नृत्य बेभान होऊन करत असल्याचे दिसले. ग्राहक महिला सेविकांना बिभत्स नृत्य करण्यास भाग पाडत होते. हा प्रकार पाहिल्यानंतर माहितीगार पोलिसांनी छापा टाकण्यासाठी आलेल्या पथकाला इशारा केला. पथके ईगो बारच्या दर्शनी आणि पाठीमागील दारातून आत शिरली. त्यांनी बारमध्ये सुरू असलेल्या प्रकाराचा पंचनामा करुन ३० हजार रुपये किमतीचा वाद्यवृंद जप्त केला.
ईगो बार चालक शिवकुमार बिराजदार (३१), वाद्यवृंद मालक विवेक सिंग यांच्यासह महिला सेविका, पुरुष सेवक आणि ग्राहकांच्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार सावकार कोळी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.पुरुष सेवक हे दिवा, साबे, मानपाडा, घारिवली, काटई भागातील रहिवासी आहेत. महिला सेविका उल्हासनगर, नवी मुंबई, चेंबूर, लोढा हेवन, मुंब्रा, मलंग रोड भागातील रहिवासी आहेत.