डोंबिवली – डोंबिवली जवळील २७ गावांमधील सोनारपाडा येथे रविवारी सकाळी दोन बैलांमध्ये निकराची झुंज लावून प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून मानपाडा पोलीस ठाण्यात तीन बैल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन दळवी, गणेश साळवी आणि बारक्या मढवी अशी बैल मालकांची नावे आहेत. हे तिघे अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल, एक जण कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावी राहतो.

सोनारपाडा येथे क्रिकेट मैदानावर रोशन दळवी, गणेश साळवी आणि बारक्या मढवी यांनी आपले खिल्लारी बैल रविवारी झुंजीसाठी आणले होते. या झुंजी पाहण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी केली होती. या झुंजीमध्ये जिंकणारा बैल आणि बैलाच्या मालकाचा मोठा मान असतो. आपला बैल झुंजीमध्ये जिंकावा म्हणून अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे या तीन मालक आणि त्यांच्या साथीदारांनी खिल्लार बैलांच्या झुंजी लावल्या. मातलेल्या बैलांनी आपली ताकद पणाला लावून एकमेकांना मागे रेटण्याचे, झुंजीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.

हेही वाचा >>>आरटीईसाठी आठवड्याभरात १० हजार अर्ज प्राप्त

आपला बैल जिंकावा म्हणून तिन्ही मालक आक्रमक होते. या झुंजीच्या दृश्यध्वनीचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याने बैलांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे मानपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

‘प्लॅन्ट फाॅर ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे’ (पाॅज) संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी सांगितले, बैलांच्या झुंजी भारतात कायदेशीर नाहीत. या झुंजीवर न्यायालये, शासनाने वेळोवेळी बंदी आदेश काढले आहेत. याला जल्लीकट्टू देखील म्हणतात. अशा झुंजी म्हणजे प्राण्यांच्या हक्काचे उल्लंघन आहे. अशा झुंजी कोणी खेळवत असेल तर नागरिकांनी स्वताहून पुढाकार घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी कराव्यात. किंवा आपणास अशाप्रकारची माहिती दिली तर ती माहिती योग्य ठिकाणी कायदेशीर कारवाईसाठी आपण पोहचवू शकतो.

हेही वाचा >>>डोंबिवलीत देवीचापाडा येथील जुगार, गांजाच्या अड्डयांमुळे नागरिक त्रस्त

कल्याण, अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती, बैलांच्या झुंजी खेळवल्या जात आहेत. सोनारपाडा येथे रविवारी दोन बैलामध्ये झुंजी लावून प्राणी हक्क कायद्याचा उल्लंघन करणाऱ्या गणेश साळवी, रोशन दळवी आणि बारक्या मढवी यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतने वागविणे कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास करून त्यांनाही या गुन्ह्यात सामील करून घेण्यात येणार आहे.-  विजय कादबाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मानपाडा पोलीस ठाणे.

Story img Loader