लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात हळदी समारंभात स्वसंरक्षणासाठीचे कंबरेचे रिव्हॉल्व्हर काढून हातात नाचवत, शस्त्राचे प्रदर्शन करत बिनदिक्कत व्हराडींमध्ये नाचणाऱ्या रिव्हॉल्व्हरधारक चिंतामण लोखंडे आणि त्यांच्या भावा विरुध्द खडकपाडा पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा शनिवारी रात्री दाखल केला. चिंतामण लोखंडे हे भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आहेत. ते व्यावसायिक आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.उंबर्डे गावात चिंतामण लोखंडे यांच्या बहिणीच्या हळदीच्या समारंभात चिंतामण लोखंडे आणि इतर व्हाराडी, नातेवाईक, लहान मुले, महिला मै हू डॉन या गाण्यावर नाचत होते. हा नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. व्हराडी नाचत असताना अचानक चिंतामण लोखंडे हे नाचण्यासाठी व्यासपीठावर आले. नाचत असताना त्यांनी कंबरेच्या उजव्या बाजुला शर्टाच्या आत खोचलेले स्वसंरक्षणासाठीचे रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. ते डाव्या हातात घेत, हात उंचावत रिव्हॉल्व्हर हातातल्या हातात फिरवू लागले. चिंतामण यांच्या या कृत्यामुळे उपस्थित व्हाराडी आश्चर्यचकित झाले.
चिंतामण लोखंडे हे हातात रिव्हॉल्व्हर घेऊन नाचत असताना त्यांच्या समोर लहान बाळ, मुले, महिला नाचत होत्या. यावेळी रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून काही दुर्घटना घडली असती तर अनर्थ घडला असता, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. चिंतामण लोखंडे हातात रिव्हॉल्व्हर घेऊन नाचत असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या चित्रफितीची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खडकपाडा पोलिसांना दिले. पोलिसांनी या दृश्यचित्रफितीची पडताळणी करून रिव्हॉल्व्हरधारक चिंतामण लोखंडे आणि त्यांच्या भावा विरुध्द शस्त्र प्रतिबंधक कायद्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाची चौकशी केली जाईल. स्वसंरक्षणासाठीच्या शस्त्राचे जाहीर प्रदर्शन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपायुक्त झेंडे यांनी दिला आहे.
दोन वर्षापूर्वी कल्याण परिसरात हळदीच्या समारंभात नाचत असताना काहींनी जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची नौटंकी केली होती. संबंधितांवर त्यावेळी गुन्हा दाखल करून त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला होता.
कल्याण, डोंबिवलीमध्ये सुमारे तीन हजार ५०० महत्वाच्या व्यक्तिंकडे स्वसंरक्षणासाठी परवानाधारी रिव्हॉल्व्हर आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमधील काही लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते अशा एकूण १९ जणांना पोलीस संरक्षण आहे. सात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी अशाप्रकारचे संरक्षण मिळण्यासाठी गृह विभागाकडे अर्ज केले आहेत. मागील तीन वर्षाच्या काळात कल्याण, डोंबिवली परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या स्वयंघोषित महत्वाच्या व्यक्तिंनी राजकीय आशीर्वादाने सशुल्क, निशुल्क पोलीस संरक्षण घेतल्याची चर्चा आहे. पोलीस संरक्षणात फिरण्याची फॅशन मागील दोन वर्षापासून शहरात आहे.