लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : डोंबिवलीतील आजदेगाव येथील एका सोसायटीत राहत असलेल्या पतीने आपल्या पत्नीचे घरातील काही अनैतिक संबंधाच्या दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्या. अशाप्रकारे बेकायदा कृती केल्याबद्दल, आपली समाजात बदनामी केल्याबद्दल संबंधित महिलेने आपल्या पती विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव येथे एक ३५ वर्षाची महिला आपल्या ४० वर्षाच्या पतीसह राहते. आपल्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय महिलेच्या पतीला होता. आपण कामावर गेल्यावर आपल्या घरात पत्नी अनैतिक प्रकार करत असल्याचा संशय वाढल्याने पतीने आपल्या संशयाची खात्री करण्यासाठी आपल्या राहत्या घरात पत्नीच्या नकळत छुपे कॅमेरे बसवून घेतले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पत्नीवर पाळत ठेवली.

आणखी वाचा-लोकलमध्ये विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून दिव्याच्या महिलेला परत

गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या राहत्या घरात पत्नी, नितीन या इसमासोबत लैंगिक क्रिया करत असल्याचे घरातील छुप्या कॅमेऱ्याने टिपले. पतीने कॅमेऱ्यातील चित्रण पाहून तो संतप्त झाला. त्याचे या विषयावरून पत्नीबरोबर वाद झाला. रागाच्या भरात पतीने पत्नीची व तिच्या मित्राची बदनामी करण्यासाठी छुप्या कॅमेऱ्यात टिपलेल्या पत्नीच्या लैंगिक प्रक्रियेच्या दृश्यध्वनी चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून पत्नीची समाजात बदनामी केली.

या प्रकाराने पतीने आपला विनयभंग करून समाजात बदनामी केल्याबद्दल पत्नीने पती विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against man who exposed his wifes immoral relationship on social media in dombivli mrj