लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील पाटकर रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री हुक्का मेजवानी करणाऱ्या तीन अनोळखी इसमांच्या विरुध्द रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन जण रिक्षा चालक असल्याची चर्चा आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ कॅनरा बँकेसमोरील पाटकर रस्त्यावर तीन इसम शुक्रवारी रात्री भांड्यात जळता कोळश्याचा निखारा घेऊन एका पाईपद्वारे हुक्का सेवनाचा आनंद घेत होते. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता हा प्रकार तीन जणांकडून सुरू होता. निखारा प्रज्वलित होऊन आग लागली तर सार्वजनिक मालमत्तेला धोका निर्माण होणार होता.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवली पालिकेत दर सोमवारी जनता दरबार

रात्रीच्या वेळेत सुरू असलेला हा प्रकार रेल्वे स्थानकातून घराकडे निघालेले प्रवासी पाहत होते. उघड्यावर जाळ करुन तीन जण बिनधास्त हुक्का मेजवानी करत असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. एका जागरुक नागरिकाने ही माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलीस येण्यापूर्वीच तीन जण पळून गेले.

दिवा येथील एक कामगार सागर पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. इंदिरा चौक, पाटकर रस्ता भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हुक्का मेजवानी करणारे रिक्षा चालक असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Story img Loader