डोंबिवली – सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला झाडांची रोपे विक्री करण्यास ठेऊन वाहतुकीला अडथळा, एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी कृती केल्यामुळे मानपाडा पोलिसांनी २७ गाव भागातील अंतर्ली फाटा-काटई रस्त्यावरील येथील एका विक्रेत्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यातील हवालदार नीतेश इंगळे यांनी झाडांची रोपे विक्री करणारा विक्रेता (नर्सरी चालक) मनीष पांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली पूर्वेतील अंतर्ली फाटा, हिरानगर, काटईकडे जाणाऱ्या रस्त्यावर मनीष पांडे हे रस्त्याच्या कडेला झाडांची रोपे ठेऊन विक्री करत होते. हवालदार नीलेश इंगळे आणि त्यांचे साथीदार शनिवारी संध्याकाळी २७ गाव ग्रामीण भागात दुचाकीवरून गस्त घालत होते. हवालदार इंगळे दुचाकीवरून अंतर्ली फाटा हिरानगर येथे आल्यावर त्यांना मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एक इसम झाडांची रोपे लावून विक्री करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दुचाकी थांबून त्या इसमाला रस्त्याच्या कडेला झाडांची रोपे ठेऊन विक्री करण्यास परवानगी आहे का, असे प्रश्न केले. तो निरुत्तर झाला. पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, प्रवाशांच्या जीविताला धोका आणि अटकाव होईल अशा पद्धतीची कृती इसम मनीष पांडे यांनी केल्या बद्दल त्यांना मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – डोंबिवलीत वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या ४० हातगाडी विक्रेते, रिक्षा चालकांवर कारवाई
डोंबिवली पूर्व भागात घरडा सर्कल ते बंदिश हाॅटेल (सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर रस्त्यावर) दरम्यानच्या वर्दळीच्या रस्त्यावर अनेक वर्षापासून वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा पद्धतीने झाडांच्या रोपांची विक्री केली जाते. मानपाडा पोलिसांची या रस्त्यावरून नियमित वर्दळ असते. पोलिसांनी ही नर्सरी चालविणाऱ्या विरुद्ध राजकीय दबाव झुगारून कारवाई करण्याची मागणी नागरिक, प्रवाशांकडून केली जात आहे.