उल्हासनगरः सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या झाडाझडतीत अनेक बांगलादेशी छुप्या पद्धतीने कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे समोर येते आहे. नुकतेच उल्हासनगरात गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन बांगलादेशींना अटक केली असून दोघेही येथे काम करत वास्तव्यास होते.
गेल्या काही दिवसात उल्हासनगर गुन्हे शाखेने विविध कारवाईत १६ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली होती. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य बांगलादेशी शहराच्या कोपऱ्यात चाळींमध्ये वास्तव्यास असल्याचे दिसून आले होते. नुकतेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आशेळे गाव येथे पोलिसांनी कारवाई करत आणखी दोन बांगलादेशींना अटक केली आहे. यात उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव रुमा बीबी हाफिजुल खान (४०) असे आहे. ती आधी कोलकाता येथे राहत होती. त्यानंतर ती खडेगोवेली परिसरात स्थायिक झाली. पोलिसांनी महिलेला राहण्याची सोय करणाऱ्या घरमालक रफिक विश्वास (४९) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. तर दुसऱ्या कारवाईत आशेळे पाडा येथीलच दर्शना कॉलनी, गोपी कडू चाळ येथे राहणाऱ्या मुनीरूल महीमुद्दीन सरदार (४१) या बांगलादेशीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.