ठाणे : ठाण्यातील माॅडेला चेकनाका भागातील एका बारवर ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कारवाई केली. या बारमध्ये नियमांचे उल्लंघन सुरु होते. तसेच बारमधील वेटर महिला ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करत होते. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात बारचा व्यवस्थापक, महिला वेटर, ग्राहक अशा २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
माॅडेला चेकनाका परिसरातील बार नियमांचे उल्लंघन करुन सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या सूचनेनुसार, १० ते १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक बारवर छापा टाकण्यासाठी निघाले. रविवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास युनीट पाचच्या पथकाने बारमध्ये छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर गाणी वाजविली जात होती. पाच महिला बारच्या मंचावर नृत्य करत होत्या. तर तीन वेटर महिला ग्राहकांसमोर अश्लील नृत्य करत होते.
पोलिसांच्या पथकाने त्यांची ओळख उपस्थितांना सांगितली. तसेच चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी या आठही महिलांची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यांचे नाव आणि पत्ते पोलिसांना सांगितले. या सर्व महिला नवी मुंबई, ठाणे आणि मिरारोड भागातील असल्याचे समोर आले. तसेच त्या २२ ते ३० या वयोगटातील होत्या. त्यानंतर पोलिसांनी येथील व्यवस्थापकाला परवान्याबद्दल विचारणा केली असता, त्याने पोलिसांसमोर कोणताही परवाना सादर केला नाही. व्यवस्थापकासह पोलिसांनी बारमधील इतर तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच बारमध्ये आलेल्या इतर आठ ग्राहकांची देखील चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनी झडती घेतली असता, ग्राहकांनी बारमध्ये उधळलेल्या २ हजार ४६० रुपये आणि व्यवस्थापक बसतो तेथून ३ हजार ७८० रुपये पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, महाराष्ट्र हाॅटेल, उपाहारगृहे, मद्यपान कक्ष यामधील अश्लील कृत्यांना प्रतिबंध घालण्याबाबत व महिलाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ चे कलम ८ (२), भारतीय न्याय संहितेचे कलम २९६ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ग्राहक मुंबईचे
– या बारमध्ये पोलिसांनी आठ ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील ग्राहक ठाण्यासह मुंबई भागातील असल्याचे समोर आले आहेत. यातील दोघे भांडूपचे, एक विक्रोळीचा, एक काळबादेवीचा आहे. तर उर्वरित ठाण्यातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, किसननगर भागातील असून एकजण मुंब्रा येथील आहे.