लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते (४४) यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे.
वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत. ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनीटमध्ये कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खासगी कामासाठी जात होते. त्याचवेळी डम्परच्या चाकाखाली आल्याने रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
अपघात नेमका कसा झाला आहे हे अद्याप कळू शकले नाही. अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले आहेत. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.