उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील १८ बोगस डॉक्टरांवर उल्हासनगर महापालितेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात २६ बोगस डॉक्टरांची यादी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पडताळणीत त्यातील चार दवाखाने बंद असल्याचे दिसून आले तर तीनच डॉक्टर महाराष्ट्र आरोग्य परिषदेकडे नोंदणीकृत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने पडताळणीअंती १८ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याप्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला होता. त्याचवेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील एकुण २६ डॉक्टरांची यादी उल्हासनगर महापालिकेला देण्यात आली होती. त्यानुसार उल्हासनगर महापालिकेने अशा डॉक्टरांची तपासणी सुरू केली होती. त्याअंतर्गत बोगस कागदपत्रे असलेल्या डॉक्टरांवर पडताळणी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आणि त्यांच्या पथकाने पडताळणी केली होती. त्यावेळी शहरातील अनेक डॉक्टर वैद्यकिय परवाना नसताना आणि अपात्रत्रेसह वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले होते. अशा बोगस डॉक्टरांच्या कागदपत्रांची पाहणी करुन त्यामध्ये आढळून आलेल्या एकुण १८ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून आता पुढील कार्यवाही सुरु आहे. पालिका प्रशासनाने या डॉक्टरांची यादी जाहीर केली आहे. अशा बेकायदेशीर डॉक्टरांकडून उपचार घेवू नये आणि संशयास्पद वैद्यकिय व्यवसायाबाबत त्वरीत प्रशासनाला कळवावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच वैध वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी आवश्यक परवानग्या अद्ययावत ठेवाव्यात अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही डॉक्टरांना दिला आहे.
महापालिकेला प्राप्त यादीनुसार २६ डॉक्टरांपैकी एकुण १८ बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित ०८ डॉक्टारांपैकी ०३ डॉक्टर महाराष्ट्र आरोग्य परिषदेकडे नोंदणीकृत आहेत. तर ०४ डॉक्टरांच्या दवाखान्यांची पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांचे दवाखाने बंद असल्याचे आढळून आले. तर एक डॉक्टर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात येत असल्याने त्या डॉक्टरवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.