कल्याण शिळफाटा रस्त्यावर देसई खाडी आहे. या खाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे निळजे गावातील ग्रामस्थ, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांना दिसला. त्यांनी ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढून ताब्यात घेतला. शवविच्छेदन केले. पण महिलेची ओळख देण्यासाठी कोणी पुढे येईना. कल्याण परिसरात कोठे महिला बेपत्ता आहे का, याचा शोध घेण्यात आला. कल्याण पूर्व भागातील मिलिंदनगरमध्ये जन्नतबी शेख (५०) या महिलेची सुलताना (३१) नावाची मुलगी गायब असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी माग काढत जन्नतबीचे घर गाठले. त्यावेळी तिने आपली मुलगी गायब असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला खाडीत सापडलेल्या मृतदेहाबाबत माहिती दिली. ते ऐकून जन्नतबी शेखच्या हृदयाचा ठोका चुकला.
मानपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी बंद खोलीतील मृतदेह दाखविला. तो मृतदेह पाहून जन्नतबी यांनी हंबरडा फोडला. पोटचा गोळा अचानक कसा काय निघून गेला, आता सुलतानाच्या मुलाचे काय होणार, या विचारानेच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलीच्या मृत्यूचे दु:ख इतके होते की, त्या अवस्थेत जन्नतबी कुणाशीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनीही सुलतानाचा दफनविधी आणि अन्य सोपस्कार होईपर्यंत संयमाची भूमिका घेतली. जन्नतबी शांत झाल्यानंतर तिने पोलिसांना माहिती देण्यास सुरुवात केली. सुलतानाचा विवाह झाला होता. तिला सात वर्षांचा एक मुलगा आहे. पतीच्या अकाली निधनानंतर सुलताना आणि मुलगा एकत्र राहात होते. सुलताना कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस प्रमोद शिंदे याच्या घरी ये-जा करत असे, अशी माहिती जन्नतबीने दिली. ज्या दिवशी सुलतानाची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशीही तिने आईला शिंदेसोबत जात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रमोद शिंदे यानेच तिची हत्या केली असावी, असा संशय जन्नतबीने व्यक्त केला. तिने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गुन्हे शाखेतील पोलीस प्रमोद शिंदे यांनीच आपल्या मुलीचा खून केला असल्याचा आरोप केला, या आरोपाने पोलीस दलात खळबळ उडाली. एका पोलिसावर आरोप झाल्यामुळे आता चौकशीचे करायचे काय, या विचाराने वरिष्ठ पोलीस अधिकारी चक्रावून गेले. पण एका महिलेने आरोप केला आहे आणि तो दुर्लक्षित केला तर, प्रकरण भारी पडेल, हा विचार करून ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. पोलीस शिंदेवर आरोप केल्यानंतर त्यानेच सुलतानावर काही विषप्रयोग तर केला नसेल ना, म्हणून तिने पोलीस आणि तहसीलदार यांच्या समक्ष सुलतानाचा दफन केलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईत जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथून तपासणी अहवाल आले. ‘एका महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसावर संशय’ असे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले आणि पोलिसांवरील तपासाचा दबाव आणखी वाढला. मग प्रमोद शिंदेला ताब्यात घेण्यात आले.
सुरुवातीला आपण त्यातले नाहीच, होणारे आरोप खोटे आहेत, अशी भूमिका प्रमोदने घेतली. पोलिसांनी सुलताना आणि प्रमोद यांचे भ्रमणध्वनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुलताना गायब झाल्याचा दिवस व त्या वेळेपासून या दोघांच्या भ्रमणध्वनींचे भ्रमणध्वनी मनोऱ्यावरून ठिकाण शोधले, दोघांचे एकमेकांशी झालेले बोलणे (कॉल डिटेक्ट रेकॉर्डर) याची माहिती पोलिसांनी जमा केली. ही सगळी माहिती मिळतीजुळती असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. शेवटी तर प्रमोद आणि सुलताना यांचे भेटीचे एकत्र ठिकाण भ्रमणध्वनी मनोऱ्याने देसई खाडी दाखविले. या तांत्रिक माहितीवरून चौकशीला गोलगोल फिरविणारा प्रमोद शिंदे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नंतर त्याने आपण हे कृत्य कसे आणि का केले याची साद्यंत्य माहिती पोलिसांना दिली.
प्रमोद हा विवाहित होता. तरीही त्याने सुलतानालाही लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर प्रेम संबंध ठेवले होते. सुलतानाला त्याने एक घर घेऊन दिले होते. तो तिच्यासोबत राहत असे. पण आपण लग्न कधी करायचे, असा तगादा सुलतानाने प्रमोदच्या पाठीमागे लावला होता. या प्रश्नाने प्रमोद अस्वस्थ होता. दोन ते तीन र्वष उलटूनही प्रमोद लग्न करीत नाही, त्यामुळे तो आपणास फसवितो की काय, अशी भीती सुलतानाच्या मनात निर्माण झाली होती. सुलतानाबरोबर लग्न केले तर, बिकट प्रश्न निर्माण होईल, ही भीती प्रमोदला अस्वस्थ करीत होती. त्यामुळे सुलतानाचा कायमचा काटा काढला तर, आपल्या मागची कटकट निघून जाईल, असा क्रूर, विषारी विचार प्रमोदच्या मनात घोळू लागला.
एक दिवस प्रमोदने सुलतानाला संपावयाचा निर्णय घेतला. आपण एकत्र जेवायला जाऊ, असे सांगून प्रमोदने कल्याणमधील चक्कीनाका येथे एक दिवस संध्याकाळी सुलातानाला बोलावून घेतले. प्रमोदने कपटीपणा करून तिच्याशी गोड बोलत तिला शिळफाटा दिशेने देसई खाडीच्या आडबाजूला नेले. तेथे त्याने सुलतानाला जिवे ठार मारले. तिचा मृतदेह खाडीत फेकून दिला. हे कृत्य उरकल्यानंतर तेथून पसार झाला. स्वत: पोलीस असल्याने पकडले जाणार नाही, असा प्रमोद शिंदेचा समज होता. मात्र घरातून निघण्यापूर्वी सुलतानाने आईकडे ठेवलेला निरोप आणि प्रमोद व सुलतानाच्या मोबाइल फोनचे ठिकाण या गोष्टींनी त्याचे पितळ उघडे पाडले.
तपासचक्र : मोबाइल ‘लोकेशन’मुळे पितळ उघडे!
मानपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी बंद खोलीतील मृतदेह दाखविला.
Written by भगवान मंडलिक
First published on: 12-01-2016 at 06:34 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime case iopen due to the location of the mobile