कल्याण जवळील शहाड येथील रेल्वे उड्डाण पुलावरुन दुचाकी वरुन जात असताना खड्डा चुकविताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रक चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडून ट्रक खाली येऊन जागीच चिरडून मरण पावली. या प्रकरणी ट्रक चालका विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली होती.

सितासरण सुदप्रसाद मिश्रा (रा. रांजनोली, ठाकुरवाडा, भिवंडी) असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. कविता प्रशांत म्हात्रे (३०, रा. म्हारळ, कल्याण) असे मयत महिलेचे नाव आहे. कविता म्हात्रे या रविवारी दुपारी कल्याण पूर्वेतील शहीद अरुण चित्ते पेट्रोल पंपावर कर्तव्यावर जाण्यास निघाल्या होत्या. त्या दुचाकी वरुन जात होत्या. शहाड उड्डाण पुलावर आल्यावर तेथील खड्डा चुकवित असताना अचानक बाजुने एक ट्रक आला. त्याने दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेत त्या रस्त्यावर पडून ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या.

हेही वाचा : कल्याणमध्ये खड्ड्यात दुचाकी आपटून टँकरखाली आल्याने चिरडून महिलेचा मृत्यू

जागीच चिरडून मरण पावल्या. याप्रकरणी पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून ट्रक चालकाचा पुलावरुन जात असताना ट्रकचा वेग तपासला. तो अधिक आढळून आला. नियमबाह्य, हयगयीने वाहन चालविल्याने मयत कविता यांचे पती प्रशांत म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रक चालक सितासरण मिश्रा याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : ठाणे : मुख्यमंत्र्याविरोधात बोललो नाही तर विरोधी पक्षनेतेपद पण हातून जाईल अशी दादांना भीती

बेशिस्त ट्रक, टँकर चालक

गेल्या १५ दिवसात कल्याण, डोंबिवली, भिवंडी, दिवा, शहापूर परिसरात ट्रक, टँकरने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिवा-आगासन रस्त्यावर खड्डे चुकवित दुचाकीवरुन जात असताना एका तरुणाची दुचाकी खड्ड्यात आपटली. तो रस्त्यावर पडून तेथून जात असलेल्या टँकरखाली आला. त्याचा जागीच मृत्यू झाला.शहापूर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकने दिलेल्या धडकेत कुकांबे गाव शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी येथे टँकरच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने टँकर, ट्रक चालविणाऱ्या चालकांवर आरटीओ, वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Story img Loader