वेगवान बाइकवर मांड ठोकून ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे आणि दागिने हिसकावताना चोरांना पोलिसांची डर राहिली नसल्याचे नुकत्याच घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी कडक अंमलबजावणीचे आदेश देऊनही अद्याप अशा घटनांमध्ये घट झालेली नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. नौपाडा परिसरात राहणाऱ्या अश्विनी अशोक पाटील (५२) यांच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचून नेले. मंगळवारी सकाळी त्या पतीसोबत तलावपाळी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी ही घटना घडली. विष्णूनगर परिसरात राहणाऱ्या अमृता नीरज वैद्य (३८) यांच्या गळ्यातील २७ हजारांचे मंगळसूत्र मोटारसायकवरून आलेल्या सोनसाखळी चोरांनी खेचले. या दोन्ही घटनांप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा येथील टिकुजिनी वाडी परिसरात राहणाऱ्या राजकुमारी रमेशचंद्र त्रिपाठी (४७) यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोनसाखळी चोरटय़ांनी खेचली. त्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ही घटना घडली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावरकरनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रावती नारायण उदयावर (५८) यांचे ६० हजारांचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या सोनसाखळी खेचले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचखोर पोलीस हवालदारास अटकठाणे : पारपत्रासंबंधी कागदपत्रे पडताळणीसाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना भोईवाडा पोलीस ठाण्यातील हवालदार दिलीप यशवंत मुकणे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. तक्रारदाराची पारपत्रासंबंधी कागदपत्रे पडताळणीसाठी हवालदार मुकणे याने त्यांच्याकडे तीन हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. भोईवाडा पोलीस चौकीजवळ लाचेची रक्कम स्वीकारताना मुकणे याला अटक केली.कल्याणमध्ये घरफोडी कल्याण : येथील मुरबाड रोड परिसरात राहणारे व्यापारी मनोज श्रीधर परिडा (३९) यांच्या घरी शनिवारी चोरी झाली. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ाने घरात प्रवेश केला आणि कपाटातून एक लाख ४० हजार रुपये रोख रक्कम चोरली. या प्रकरणी मोहन गोविंद शेट्टी (२४) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इमारतीच्या जिन्यात वृद्धेला लुटलेडोंबिवली : डोंबिवली येथील शिवशंकर इमारतीत राहणाऱ्या कुसुम अरविंद खांडेकर (८०) या सोमवारी घरी जाण्यासाठी पहिला मजला चढत होत्या. त्या वेळी नितीन राधाकृष्ण गुरव (२६) याने त्यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ चोरली. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बदलापूरमध्ये ९० हजार रुपयांची चोरीबदलापूर : येथील अष्टविनायक पार्क भागात राहणाऱ्या मुकेश सदानंद शिंदे (२८) यांच्या घरी मंगळवारी चोरी झाली. प्रसाधनगृहाच्या खिडकीची काच फोडून चोरटय़ाने घरात प्रवेश केला आणि शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने, रोख असा ८९ हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.