आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक
प्रतिनिधी, डोंबिवली
तामिळनाडूसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत चोऱ्या, घरफोडय़ा, अपहरण, लुटमारीसारखे गुन्हे करणाऱ्या एस मनिकंडन व प्रभू नाडर या दोघांना कल्याण पोलिसांनी तामीळनाडूमधून अटक केली आहे. या दोघांविरोधात तामिळनाडू राज्यात १२ तर महाराष्ट्र राज्यात पाच गुन्हे दाखल असून त्यापैकी चार गुन्हे कल्याण-डोंबिवली तर एक गुन्हा मुंब्रा भागातील आहे. या गुन्ह्य़ांत वापरलेली कार, हत्यारे आणि लुटून नेलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या दोघांचे अन्य साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कल्याण-डोंबिवली परिसरातील चोरीचे आणि त्यासाठी जीवघेणा हल्ला करण्याचे प्रकार या टोळीकडून सुरू होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कल्याण पोलीस या टोळीच्या मागावर होती. अखेर पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्या पथकाने दिव्यातून लुटारूंची कार जप्त केली. तामीळनाडू राज्यातील मदुराई परिसरातील ही कार असून लुटारू टोळीने तेथून चोरून आणल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार, या पथकाने या टोळीचा माग काढण्यासाठी तामीळनाडू राज्यातल्या कुडनकुलन भागात साप़ळा रचला आणि तेथून एस. मनिकंडन आणि प्रभू नाडर या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
२२ जून रोजी मानपाडा रोडला शंकेश्वर नगर येथे राहणारी वर्षां जोशी ही महिला रात्रीच्या सुमारास शनिमंदिर रोडने पायी जात असताना कारमधून आलेल्या लुटारूंनी या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांनी मानपाडा रोडवरील संघवी गार्डन-पिंपळेश्वर येथे पहाटेच्या सुमारास ब्रिजेश मौर्या यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवून सोनू म्हात्रे यांच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. हल्लेखोरांनी लूटमारीच्या उद्देशाने हा हल्ला चढवून कारमधून पलायन केले होते. त्यानतंर ५ जुलै रोजी डोंबिवली पश्चिमेतील दोन महिलांचे कारमधून अपहरण करत त्यांच्याकडील मोबाइल आणि दागिन्यांची लूट करण्यात आली होती. या प्रकरणी देवीपाडा परिसरात राहणारे मितेश पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या
डोंबिवली – पूर्वेतील न्यू आयरे रोड भागातील विठ्ठलकृपा सोसायटीत राहणारा प्रतीक देवकर (२०) याची पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
या प्रकरणी संशयित आरोपी जितेश पाटील याला ताब्यात घेतल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी दिली. गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर प्रतीक मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी त्याच्या छातीवर, पोटावर व मांडीवर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी जितेशचा मोठा भाऊ व प्रतीक यांच्यात वादावादी झाली होती. यावेळी प्रतीकने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग जितेश याच्या डोक्यात होता. यातूनच त्याने प्रतीकचा खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
हत्येच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्यास अटक
वार्ताहर, शहापूर
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात झालेल्या वादातून एका दलालाची हत्या करण्याच्या उद्देशातून त्याचे अपहरण करणाऱ्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कपिल जाधव याला अटक करण्यात आली आहे. मात्र अपहरण झालेल्या तरुणाचा अजूनपर्यंत शोध लागला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी येथील एका जमिनीचा व्यवहार पूणधे येथील दत्ता भोईर व पडघा येथील कपिल जाधव यांनी केला होता. या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाल्याने कपिल याने दत्ता भोईर याची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले आहे, अशी तक्रार दत्ताचा भाऊ मंगेश याने शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे.
दीड लाखांची रोकड लंपास
ठाणे – मानपाडा मार्केटमधील किराणा दुकानात मागील ऑर्डरच्या वसुलीचे पैसे गोळा करणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेमधून चोरटय़ांनी एक लाख ४६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी तक्रारदार हे मानपाडा मार्केटमधील १० ते १२ किराणा दुकानात जाऊन मागील ऑर्डरची पैसे जमा करत होते. यावेळी त्यांच्या मोटारसायकलची चावी कोणीतरी काढून घेतली. इथेच कुठे तरी चावी पडली असेल ती शोधा असे सांगत चोरटय़ाने त्यांच्यी सूटकेसमधून दीड लाखांची रोकड असलेली पिशवी चोरुन नेली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात तिघे जखमी
कल्याण – पूर्वेतील चिंचपाडा भागात बुधवारी सकाळी रिक्षा आणि मोटारसायकलचा अपघात झाला असून यामध्ये मोटारसायकलस्वार, रिक्षाचालक आणि प्रवासी असे तिघेही जखमी झाले आहेत.
प्रवासी रमेश सातवे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून मोटारसायकलस्वार अंकुश गोडसे व रिक्षाचालक यांच्या डोक्याला मार लागला आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाने दिलेल्या तक्रारीवरून मोटारसायकलस्वार अंकुश गोडसे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्यास तरुणीकडून चोप
डोंबिवली – पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी सकाळी एक व्यक्ती रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत होती. ही बाब तरुणीच्या लक्षात येताच तिने त्याला हटकले आणि मोबाइल दाखविण्यास सांगितले. मात्र, त्याने मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे तिने त्याला मारहाण केली. तिथे जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी धाव घेतली असता, त्या तरुणीने त्याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी तरुणी तक्रार देण्यास तयार नसल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
२२ हजाराची घरफोडी
ठाणे – येथील वसंत विहार परिसरातील केतकी अपार्टमेंटमधील एका घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून ही चोरी १० ते १६ जुलै या कालावधीत झाली आहे. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरातील एकूण २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.