रक्कम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फसवले
डोंबिवली : बारकूबाई निवास येथे राहणाऱ्या मिनाताई साळवे या महिलेला पलाश देवघरिया व स्मिती देवघरिया या दाम्प्त्याने पैसे दुप्पट करून देतो, अशी बतावणी करून फसविले.
बाजी प्रभू चौकातील घरकुल दीपक इमारतीत देवघरिया यांचे कार्यालय आहे. त्यांनी हरिओम सेवा संस्थांचे अंतर्गत चालत असलेल्या ‘स्वामी नारायण ट्रान्सपोर्ट हॉलिडे फॉर यू’नावाच्या कंपनीत पैसे गुंतवणूक केली तर सात दिवसांत दुप्पट पैसे दिले जातील, असे सांगितले. त्यामुळे ७ फेब्रुवारी २०१४ मध्ये साळवे यांनी ५५ हजार रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली. मात्र, आजपर्यंत दुप्पट पैसे मिळाले नाहीत. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा लाखांची फसवणूक
ठाणे : सावरकरनगरमध्ये राहणारे शिवा राऊळ व त्यांचा पुतण्या बाळकृष्ण राऊळ यांना बांधकाम व्यवसाय करणाऱ्या सचिन जाधव या व्यक्तीने १० लाखांना फसविले आहे. वाडा येथील कुडूस येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी सचिन जाधव याने राऊळ यांच्याकडून १० रुपये घेतले. मात्र करारनाम्याप्रमाणे रक्कम परत केली नाही. त्यामुळे नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन ठिकाणी घरफोडी
डोंबिवली : गणेशनगर येथील अमरजीवन सोसाटीमध्ये राहणारे उमेश महाजन हे गावी गेले असताना चोरटय़ाने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरातील ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर कॅम्प नं ४ विनोद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रुपा नानकाणी यांच्या घराचे लॅच तोडून चोरटय़ाने घरातील एकूण एक लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळीची चोरी
डोंबिवली : तिसगाव रोड येथे राहणाऱ्या रेखा पांडे या सोमवारी पूणे लिंक रोड येथून प्रवास करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकल चोरीच्या घटना
ठाणे : धोबी आळी येथे राहणारे राजेश देसाई यांची अनमोल अॅनेक्ससमोर सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली मोटारसायकल चोरटय़ाने चोरून नेली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथील ओटी सेक्शन येथे राहणारे सुनील रामचंदानी यांची घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरीस गेली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील उपवन परिसरात खगेश बिहारी रहात असून त्यांची घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल रात्री चोरीला गेली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसमधून मोबाइलची चोरी
ठाणे : पनवेलमध्ये रहाणारे विशाल चौधरी सोमवारी ठाणे स्थानकातून मिरा रोडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. ही बस गोकूळनगर बसस्टॉपवर थांबल्यानंतर ते बसमधून खाली उतरत होते. त्यावेळी त्यांच्या हातातील सॅमसंग नोट ३ हा मोबाईल चोरीला गेला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.