मित्रासोबत संभाषण करीत असल्याची छायाचित्रे व चित्रफीत काढून एका तरुणीला धमकाविणाऱ्या आणि तिच्याकडून २५ हजार रुपये उकळणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला नुकतीच कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. प्रियांक दुबे (१९) असे या तरुणाचे नाव असून तो त्याच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या या तरुणीला ब्लॅकमेल करीत होता.
कल्याण (पूर्व) भागात असलेल्या या महाविद्यालयात शिकणारी ही तरुणी महाविद्यालयाच्या आवारात आपल्या एका मित्रासोबत बोलत होती. प्रियांकने तिची व तिच्या मित्राच्या संभाषणाची छायाचित्रे व चित्रफीत काढली. त्यानंतर त्याने या तरुणीला गाठले आणि ही छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर प्रदर्शित करणार आहे, अशी धमकी दिली. ही छायाचित्रे मी विकृत स्वरूपात प्रसारित करू शकतो, असेही त्याने धमकावले. बदनामी टाळायची असेल तर आपणास दुचाकी घेण्यासाठी २५ हजार रुपये दे, अशी मागणी या तरुणीकडे प्रियांकने केली. ही छायाचित्रे जर कुटुंबीयांपर्यंत पोहोचली तर घरातून ओरडा खायला मिळेल आणि विकृती स्वरूपात जर प्रसारित झाली तर मोठी बदनामी होईल या भीतीने घरात कुणालाही न सांगता या तरुणीने बँक खात्यातून २५ हजार रुपये काढून प्रियांकला दिले. तिच्या वडिलांना हा प्रकार समजताच या तरुणीने सर्व सत्य सांगितले. तिच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि प्रियांकविरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्रियांकला अटक केली आहे.
एमआयडीसीतील सांडपाणी थेट खाडीत
प्रतिनिधी, डोंबिवली
डोंबिवलीतील महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक आणि निवासी विभागातून दररोज ४५ लाख लिटर सांडपाणी तयार होते. हे सांडपाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडण्यात येत असल्याची धक्कादायक कबुली औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एमआयडीसीत दररोज तयार होणाऱ्या सांडपाण्यावर सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. याबाबतचा एक प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर एमआयडीसीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागातून एमआयडीसी दर वर्षी सांडपाणी कर वसूल करते. या कराच्या माध्यमातून नागरी सुविधा देणे एमआयडीसीवर बंधनकारक असते. गेल्या वर्षभरात एमआयडीसीने सांडपाणी करातून ४ कोटी ३७ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. कर रूपाने जमा होणारा पैसा एमआयडीसीकडून विहित कामांसाठी खर्च केला जात नाही. त्यामुळे प्रदूषण, जलप्रदूषण या समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.