ठाणे : ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे उपचारासाठी आलेल्या एका गरोदर महिला डॉक्टरच्या पोटात कापडी गोळा (सर्जिकल मॉप) अडकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ज्युपिटर रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. आशुतोश आजगावकर, साहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया महाजन, भूलतज्ज्ञ डॉ. चिन्मयी गडकरी आणि एका परिचारिके विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार यांचे नाव डॉ. मृण्मयी दिवेकर असून त्या माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे सातारा येथे क्लिनीक आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मे २०२० मध्ये गरोदर होत्या. त्यावेळी उपचारासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. आजगावकर यांनी उपचार केले. उपचारासाठी आजगावकर यांच्यासोबत डॉ. सुप्रिया महाजन, डॉ. चिन्मयी गडकरी आणि एक परिचारिका उपस्थित होती. त्यांची प्रसुती झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले. परंतु घरी आल्यानंतर त्यांना पोट दुखीमुळे असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे काही दिवसांनी त्या पुन्हा ज्युपिटर रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. आजगावकर यांना भेटल्या. त्यावेळी आजगावकर यांनी त्यांना काही औषधे दिली होती. परंतु त्यानंतरही त्यांच्या वेदना कमी होत नसल्याने ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी सातारा येथे पोटाची तसेच रक्ताची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या पोटातील आतड्यांमध्ये तसेच अंडाशयाच्या उजव्या नळीला एक कापडी गोळा चिटकल्याचे आढळून आले. या घटनेनंतर त्यांच्या पोटातील कापडी गोळा सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करून काढण्यात आला. त्यानंतर मृण्मयी यांचे वडिल मिलींद पाटणकर यांनी जानेवारी २०२१ मध्ये याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वर्तकनगर पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडे याप्रकरणाचा अभिप्राय मागितला होता. डॉक्टरांचा अभिप्राय मिळाल्यानंतर सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अंडाशयातील नळीला गंभीर दुखापत होऊन पू आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणात ज्युपिटर रुग्णालयातील शल्यचिकित्सकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅक्टरांनी याप्रकरणात अटक टाळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. अशी माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

यासंदर्भात गुन्हा दाखल असलेल्या एका डॉक्टरला विचारले असता, “बाळाच्या हृदयाचे ठोके झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णास शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले होते. आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने शस्रक्रिया करण्यात आली. बाळाच्या जन्मानंतर रुग्णाला खूप रक्तस्त्राव झाला होता. हा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी तसेच गर्भाशय काढून टाकण्यास प्रतिबंधित करण्यासाठी तातडीचे उपाय केले गेले. तत्परतेने आणि वेळीच उपाययोजना केल्याने बाळ आणि आईचे प्राण वाचले,” असे त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes against doctors jupiter hospital complaint piece cloth stuck woman stomach negligence ysh