लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवली जवळील २७ गावांमधील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या भूमिपुत्र पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मागील आठवड्यापासून शिळफाटा या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील सोनारपाडा भागात बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण करताना शिळफाटा रस्त्यालगतच्या सीमापट्टीवर खड्डे खोदून त्यावर मंडप उभारणी केली होती. या उपोषणाला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून हे उपोषण मोडून काढून सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या २२ पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार मधुकर टिकेकर यांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक संपत्तीस हानी पोहचविणे या कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शिळफाटा रस्ते बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन जयवंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश नेते संतोष अंर्जुन केणे, हनुमान सत्यवान पाटील, महेश शनिवार संते, करसन सिताराम पाटील, मधुकर तुकाराम माळी, संदीप बाळाराम पालकरी, शिवाजी माळी, मधुकर ह. पाटील, सुनील रामा पाटील, रामचंद्र बळीराम पाटील, अजित बाळाराम म्हात्रे, शिरिषकुमार काथोड म्हात्रे, उत्कर्ष शिरिषकुमार म्हात्रे, महादु शंकर म्हात्रे, संजय अंकुश म्हात्रे, कुणाल शरद पाटील, दीपक लहु म्हात्रे, दशरथ बुधाजी म्हात्रे, रतन चांगो पाटील यांचा समावेश आहे.

आणखी वाचा-ठाण्यात मालिकांच्या चित्रीकरण बनावट परवानगीचे पत्र, पत्रावर पोलीस उपायुक्ताची बनावट स्वाक्षरी

हे आंदोलनकर्ते गेल्या मंगळवार पासून शिळफाट रस्त्यावरील सोनारपाडा येथील साईबाबा मंदिराजवळ पोलिसांची परवानगी न घेता आपल्या विविध मागण्यांसाठी मंडप टाकून बेमुदत उपोषणाला बसले होते.

रस्त्याची नासधूस

शिळफाटा रस्त्याच्या सीमा पट्टीवर आंदोलनकर्त्यांनी खड्डे खोदून त्यामध्ये बांबू रोवून रस्त्याची नासधूस करून मंडप उभारणी केली होती. पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची मागणी करूनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शुक्रवारी रात्री मानपाडा पोलिसांनी हे आंदोलन आणि त्या ठिकाणचा मांडव काढून टाकण्याची तंबी कार्यकर्त्यांना दिली. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले, पोलिसांच्या एकत्रित जमाव जमविणे या मनाई हुकुमाचा आदेश मोडला म्हणून २२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कार्यकर्त्यांच्या मागण्या

शिळफाट्या रस्त्यावरील मेट्रो मार्ग दुहेरी उन्नत करण्यात यावा. वरच्या मार्गिकेतून मेट्रो, दुसऱ्या आणि तळाच्या मार्गिकेतून वाहने धावण्याची सुविधा नागपूरच्या धर्तीवर करण्यात यावी. माणगाव येथे मेट्रोची कारशेड उभारण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी आहेत. त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. मेट्रो प्रकल्पात भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्य द्यावे. अशा अनेक मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा-ठाणे बाजारपेठेतील ८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

विकास प्रकल्पांची गरज आहे. पण त्यासाठी २७ गावातील स्थानिक भूमिपुत्रांना उध्दवस्त करून प्रकल्प राबवू नयेत. त्यांना त्याचा योग्य मोबदला देण्यात यावा. वेळोवेळी भूमिपुत्रांना विश्वासात न घेता प्रकल्प राबवून २७ गावातील शेतकऱ्यांना बेघर करण्यात आले आहे. -गजानन पाटील, उपोषणकर्ता.

मनमानी पध्दतीने २७ गाव हद्दीत प्रकल्प राबविले जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना मोबदला न देता शासनाकडून लाटल्या जात आहेत. हे भूमिपुत्र आता सहन करणार नाहीत. -संतोष केणे, प्रदेश काँग्रेस नेते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes against youth officials of 27 villages for digging potholes and destroying shilpata road mrj
Show comments